प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : चार ठिकाणी घरकाम करून संसाराचा डोलारा सांभाळणारी ती... वय 30 वर्षे... पदरी चार मुली... नवरा दुसऱ्या गावी कापडकाम करणारा कारागीर... परवा एका मालकिणीने फोन करून सांगितले की, 'लॉकडाऊन संपले तरी यापुढे कामाला येऊ नकोस'... मोठे काम सुटणार, या टेन्शनने तिने कारण विचारले... समोरून उत्तर आले, 'तू विशिष्ट धर्माची आहेस म्हणून'...!
एकीकडे कोरोना विषाणू देश, भाषा, जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदाभेद न करता सर्वत्र झपाट्याने पसरतो आहे आणि या भयाण संकटातही माणसाच्या मनातील जाती-भेदाच्या भिंती तुटायला तयार नाहीत. सुशिक्षित लोक सुधारणांचा लवकर स्वीकार करतात, असे गृहितक नेहमीच मांडले जाते. पण, आजही अशी उदाहरणे समोर आली की यातील फोलपणा लक्षात येतो आणि समाज अजून सुधारलेला नाही, यावर शिक्कामोर्तब होत जाते.
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली. महिन्याभरातच कोरोनाबधितांची संख्या हजारोंच्या घरात जाऊन पोहोचली. एकीकडे सरकार सामान्यांना आवाहन करत कोरोनाशी लढा देत आहे, 'घरीच थांबा, सुरक्षित रहा' असे सांगत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार असे अनेक घटक रात्रंदिवस झटत आहेत. अशा वेळी समाजातील सर्व घटकांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करणारी अशी उदाहरणे अस्वस्थ करणारी ठरत आहेत.
'लोकमत'शी बोलताना 'ती' म्हणाली, 'हात आणि पोटाची लढाई लढताना धर्माचा केव्हाच विसर पडला आहे. लहानपणापासून गरिबीशी कायमचीच मैत्री झाली. चार मुलींचा सांभाळ, आईचे आजारपण, नवऱ्याचा अनियमित मिळणारा पगार अशा अनेक कटकटी पाठलाग करतात. नवऱ्याचा कामातील प्रामाणिकपणा पाहून कापडमालक त्याला घेऊन दुबईला गेला आणि काही दिवसातच कोरोना आला. नवऱ्याचे तिकडे भयंकर हाल सुरू आहेत. मी चार-पाच ठिकाणची घरकामे करून घरची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली. एका दुकानतले आणि एका पार्लरमधले साफसफाईचे काम आपोआपच बंद पडले. एका मालकिणीच्या घरी धुणे, भांडी, केर, फरशी अशी चार कामे करत होते. दोन-अडीच हजार रुपये मिळत होते. त्या बाईने फोन करून सांगितले की आता तू लॉकडाऊन संपले तरी कामाला येऊ नकोस, कारण तू विशिष्ट धर्माची आहेस.'
ती म्हणाली, 'कोरोनामुळे आधीच खूप अडचणी आल्या आहेत. रेशनचे धान्य अजून मिळालेले नाही. मी एका विशिष्ट धर्माची आहे यात माझा दोष आहे का? रोग धर्म-जात पाहून होतो का?' मी राहात असलेल्या भाड्याच्या घरातून मला काढून टाकावे, असे आजूबाजूच्या लोकांनी घरमालकिणीला सांगितले. पण ती मनाने चांगली असल्यामुळे तिने कोणाचे काही ऐकले नाही आणि लगेच भाड्याचे पैसे दे, म्हणून मागेही लागलेली नाही.'