पुणे : भामा-आसखेड धरणातून पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीतून आळंदी शहराला पाणी देण्यास पुणे महापालिका तयार नसेल, तर या जलवाहिनीचे काम होवू देणार नाही. हे पाणी आमच्या हक्क्याचे आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया आळंदीकरांच्या येत आहेत. आळंदी पालिकेने सर्वसाधारण सभेत १२ डिसेंबर २०१४ला ठराव करून पुणे महापालिकेकडे जाणाऱ्या पाणी योजनेस जोड देऊन पाणी घेण्याचा ठराव केला व मशी मागणी पुणे महापालिकेकडे केली होती. त्याला उत्तर म्हणून पाणी देणे शक्य नसल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत हे पाणी आळंदीला देता येणार नाही, असे कळविले आहे. यावर आळंदीकरांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.खेडचे आमदार सुरेश गारे यांनी, पुणे महापालिकेने उपस्थित केलेले मुद्दे हे वरवरचे आहेत. आम्ही काय वैयक्तिक कामासाठी पाणी मागत नाही. आळंदी हे तीर्थक्षेत्र असून, येथे दररोज व यात्रेनिमित्त लाखो भाविक येतात. त्यांना दूषित पाणी प्यावे लागते. असे असताना जर पाणी देण्यास विरोध होणार असेल, तर आळंदीकरही याला उत्तर देतील. आम्ही महापालिकेशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. आळंदीचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी थेट इशारा देत, जर पाणी मिळणार नसेल, तर आम्ही पुण्याला जाणारे पाणी रोखू. हे पाणी आमच्या हक्काचे आहे. ते मिळालेच पाहिजे. कोणाला काय कारवाई करायची, ते करू द्या. आम्ही पाईपलाईनचे काम होऊ देणार नाही.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांनीही तर पाईपलाईन आमच्या हद्दीत खोदू देणार नाही असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
...तर पुण्याचे पाणीही रोखू!
By admin | Published: February 12, 2015 2:27 AM