पुणे : राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. सोशल मीडियावरून त्या सातत्याने राजकीय घडामोडी संदर्भात पोस्ट करत असतात. राज्य सरकारच्या निर्णयावर टीकाटिपण्णी, विकास कामांबाबत भेटी, महिला अत्याचाराबाबत लढा देणे, अशा पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवरून केल्या जातात. पाटील यांच्या एखादया पोस्टवर अक्षरशः कमेंटचा पाऊसच पडतो. याबाबतच पाटील यांनी समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या नागरिकांना एक विनंती केली आहे. माझ्या हक्काच्या पेजवर घाण कमेंट करणे बंद करावे असे त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
पाटील म्हणाल्या, सोशल मीडियावर माझे स्वतःचे मालकी हक्काचे पेज आहे. समाजातील चुकीच्या घटना, केलेले चांगले काम या साठी मी सोशल मीडियाचा वापर करते. माझ्या पेजवर अनेक वडीलधारी मंडळी बंधू, भगिनी, मैत्रिणी , मित्र चांगल्या घरातील लोक माझ्या पेजवर आहेत. आमचा मोठा परिवार आहे. पेजवर ,अकाउंटवर जाणून बुजून अंध भक्त ,घाण कमेंट करणारे लोकांनी माझ्या पेजवर येऊ नये.
''पेज माझ्या मालकी हक्काचे आहे.त्यामुळे जे घाण कमेंट, बदनामीकारक बोलतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतेच. परंतु चांगल्या कामाचा वेळ वाया जातो त्यामुळे माझ्या पेज वर कृपया घाण कमेंट, प्रोफाइल बंद बोलणाऱ्या लोकांनी येऊ नये अशी विनंती रुपाली पाटील यांनी केली आहे.''