- लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाळवाडी : धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले वाडेबोल्हाई येथील पुरातन बोल्हाई माता मंदिराजवळील (पिंपरी सांडस ) वनविभागाच्या जागेत पुणे महानगरपालिकेच्या कचरा डेपोस विरोध करण्यासाठी व शासनास धडा शिकविण्यासाठी पुणे-नगर मार्गावर वाघोली येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कचराविरोध प्रश्न सर्वपक्षीय आंदोलन आज सकाळी करण्यात आले. वाडेबोल्हाई जवळील वनविभागात पुणे पालिकेने कचरा टाकल्याचा घाट घालण्यात आल्याने बोल्हाई माता मंदिरात कचरा डेपोमुळे पावित्र्य संपुष्टांत येण्याची शक्यता व परिसरात घाणीचे सामराज्य पसरेल, अशी भीती भाविकांनी व्यक्त केली. प्रस्तावित होणाऱ्या कचरा डेपो,वारंवार लागणारी आग, होणारा पाण्याचा वापर हे पाणी भीमानदीपात्रात गेल्याने भीमानदी प्रदूषित होऊन येथील शेतकऱ्यांचा व्यवसाय संपुष्टात येईल. शेतकरी देशोधडीला लागून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील असे मत विकास लवांडे यांनी सांगून आरोग्य मानवासह पाळीव प्राणी व शेती धोक्यात येईल, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. स्वच्छ पुणे,सुंदर पुणे भितींवर. पण आमचे पुणे स्वच्छ राहाण्यासाठी आमचा कचरा मात्र हवेली तालुक्याच्या ग्रामीण भागात. हा ग्रामीण भागावर अन्याय असल्याचे आढाळराव व प्रदीप कंद यांनी सांगून, वेळप्रसंगी हातात झेंडा घेऊन हौतात्म्य पत्करू. पण, एकही कचऱ्याची गाडी वाघोलीतून पुढे जाणार नाही, असे संजय सातव व ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.हडपसर, भैरोबा नाला, मुंढवा, कोंढवा, वानवडी परिसरातील कचऱ्याच्या गाड्या मांजरी मार्गेच बोल्हाई,पिंपरी सांडसला जाणार असल्याने गाडीतून सांडलेल्या कचऱ्यांचे प्रदूषण मांजरी गावाला होणार असल्याचे रोहिदास उंद्रे यांनी सांगून पुण्याचा कचरा पुण्यातच जिरवावा, असे मत अशोक पवार,प्रदीप कंद यांनी व्यक्त केले. शिवसेना संजय सातव म्हणाले की,वाघोलीतून एकही कचऱ्याची गाडी जाणार नाही. खासदार आढळराव म्हणाले की,मी सदैव स्थानिक शेतकऱ्यांबरोबर असून एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ,पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद ,माजी आमदार अशोक पवार , पुणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके,पुणे जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, हवेली पंचायत समिती सदस्य राजेंद्र पठारे ,माजी सदस्य सुरेश सातव, ज्ञानेश्वर वाळके, सुभाष जगताप आदी उपस्थित होते.मावळची पुनरावृत्तीची वाट पाहू नका...पिंपरी सांडस ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे. प्रशासनाने डोळे उघडून पाहावे, अभ्यासदौरे करावे, शहरातील कचरा शहरातच जिरवावा, कचरा डेपो शहराच्या बाहेर नको, फुरसुंगीत नको, कोणताही निर्णय लादू नये, जबरदस्ती करू नये. प्रशासन उदासीन आहे. योग्य निर्णय वेळेत घ्यावेत, जबरदस्ती निर्णय लादू नये, अन्यथा मावळ आंदोलनाची पुनरावृत्ती होईल. अंत पाहू नका.- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार स्मार्टसिटीचे गोडवे गाता, मग तुमचा कचरा आमच्या हद्दीत कशाला टाकता. आम्हाला आदर्श ग्राम करायचे आहे. पुणे शहराचा कचरा बाहेर नको, सामान्य माणूस ते सहन करणार नाही. - अशोक पवार, माजी आमदार