दावडी : जऊळके (ता. खेड) येथील दगडखाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्वत्र धूलिकणांचे अस्तर पसरले आहे. त्या विरोधात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळे रस्त्यावर गुरे सोडून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. खेड तालुक्याचा पूर्व भागातील जऊळके बुद्रुक या परिसरात पाच दगडखाणी आहेत. त्यामुळे येथून रात्रंदिवस खडी क्रशरची वाहतूक होत आहे. त्यामुळे येथील जऊळके, वाफगाव, गुळणी, जरेवाडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुलीकण श्वासावाटे शरीरात जाऊन अनेकांना पोट, फुफ्फुस व डोळ्यांचे विकार जडले आहेत. या परिसरातील या धुलीकणांमुळे जनावरेदेखील आजारी पडत आहे. त्याच्या फटका दुभत्या व गाभण जनावरांना बसत आहे. सततच्या धुळीमुळे रस्त्यालगतची तसेच दगडखाणी लगतची शेतजमिन नापीक बनल्या आहेत. ट्रक, डंपरमधून क्षमतेपेक्षा जास्त खडीची वाहतूक होत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेला जऊळके-वाफगाव रस्त्याची वाट लागली आहे. जरेवाडी येथे ही डोंगरात दगडखाणी आहेत. येथेही गावातून मोठ्या प्रमाणात अहोरात्र वाहतूक होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचाही जीव गुदरमरला आहे. सर्वत्र घरात धूळ येत आहे. त्यामुळे भांडी, कपडे, तसेच घरातील इतर वस्तुंवर धूळ जमा होत आहे.या रस्त्यालगत जरेवाडी, भांबुरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही धुळीचा त्रास होत आहे. या रस्त्याने सतत अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने हा रस्ताही मृत्यूचा सापळा बनला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, वाफगावचे उपसरपंच अजय भागवत यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ पारधी, सरपंच नवनाथ कानडे, माजी सरपंच अरुण येवले, संजय खंडागळे, सुनील येवले, शरद थिटे, सूर्यकांत येवले, शोभा येवले, नंदा येवले, मनीषा येवले, मीना येवले, अमोल बोऱ्हाडे, राजू माघाडे, संजय रामाणे, लहू जाधव, आत्माराम खंडागळे, मच्छिंद्र येवले, एकनाथ कराळे, सोपान येवले, अनंथा आडवळे, अतुल येवले यांच्यासह गावतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दगडखाणीविरोधात नागरिकांचा रास्ता रोको
By admin | Published: March 26, 2017 1:37 AM