इंदापूर तालुक्यामध्ये महावितरणने वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे. बुधवारी निमगाव केतकी, गोतंडी, अजोती, पडस्थळ आदी अनेक गावांच्या परिसरात डीपी सोडवून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करणेचे काम सुरू केले आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आज गुरुवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी केली.
यासंदर्भात, हर्षवर्धन पाटील यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याने वीजतोडणी मोहीम तत्काळ थांबवावी व खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. राज्य शासनाच्या शेतीपंपांची वीजतोडणी मोहिमेमुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्ग संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. जर महावितरणने वीजतोडणी मोहीम थांबवून शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला नाही, तर मात्र भाजपाच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.