पुणे : खासदार संजय राऊत यांनी लाेकमतच्या पत्रकारिता पुरस्कार साेहळ्यात त्यांच्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. उदयन राजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत असे वक्तव्य राऊत यांनी केले हाेते. त्यांच्या या वक्तव्याचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. मराठा क्रांती ठाेक माेर्चाकडून संजय राऊत यांना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्यथा शिवप्रेमी त्यांच्याप्रमाणेे आवरतील असा इशारा ठाेक माेर्चाकडून देण्यात आला आहे.
लाेकमत पत्रकारिता पुरस्कार बुधवारी पुण्यात पार पडला. या साेहळ्यात संजय राऊत यांच्या खास मुलाखतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी उदयनराजेंच्या ''शिवसेनेने शिवसेना नाव ठेवताना महाराजांच्या वंशजांना विचारले हाेते का ?'' या वक्तबाबत राऊत यांना विचारले असता, उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत असे वक्तव्य त्यांनी केले हाेते. आज मराठा क्रांती ठाेक माेर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्याचबराेबर नरेंद्र माेदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी - नरेंद्र माेदी ' या पुस्तकाच्या लेखकाचा देखील निषेध करण्यात आला.
यावेळी ठाेक माेर्चाचे संजय सावंत म्हणाले, ''संजय राऊत यांनी जे विधान केले त्याचा आम्ही निषेध करताे. त्याचबराेबर माेदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या गाेयल यांचा देखील निषेध करताे. राऊत आणि गाेयल हे प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करत आहेत. राजकारणात काय बाेलायचे ते बाेला परंतु आमच्या अस्मितेविषयी बाेलत असाल तर आम्ही घरात घुसून मारु. मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना आवरावं नाहीतर शिवप्रेमी त्यांच्याप्रमाणे आवरतील. संजय राऊतांच्या लिखाणावर तसेच बाेलण्यावर बंदी घालावी. नाहीतर राऊत यांना ठाेक भाषेतून आम्ही उत्तर देऊ.''