पुणे: पुण्यात बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने कालपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. काल आरटीओजवळ १० हजार रिक्षाचालक रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. आजही संघटनेने बेमुदत आंदोलन सुरु ठेवले आहे. प्रशासकीय पातळीवर बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी सरकार व परिवहन विभागाकडून काहीच ठोस पाउले न उचलल्यामुळे रिक्षाचालकांनी आज पुणे आरटीओ समोर 1 तास रास्ता रोको आंदोलन केले.
सामान्य नागरिकांना जास्त त्रास न होता सरकारला या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून ठरवून एकच तास रास्ता रोको केले. अंदाजे 10 हजार रिक्षाचालकांनी रास्ता रोको मध्ये भाग घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये बघतोय रिक्षावालाने बेमुदत बंद च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून काही तुरळक घटना वगळता बंद शांतीत पार पडला. बेकायदा बाईक टॅक्सी बंद होई पर्यंत डॉ. केशव नाना क्षीरसागर यांचे आमरण उपोषण व रिक्षा बंद असेच चालू राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
युवकांना दंड करण्यापेक्षा कंपन्यांवर कारवाई करा
राज्य सरकार सरकार आणि प्रशासन यांनी बाईक टॅक्सी बेकायदा आहे. हे त्यांनी प्रेस नोट देऊन मान्य केलेले असून सुद्धा प्रत्यक्षात प्रशासन ओला/ उबेर / रॅपीडो सारख्या कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाही. ते फक्त जे युवक बाईक टॅक्सी व्यवसाय करत आहेत, त्यांनाच वेठीस धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. परंतु ज्या मोठमोठ्या कंपन्या या युवकांना फसवून,या बेकायदा व्यवसायामध्ये आणत आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली नसून, त्यांच्यावर साधा एक रुपयाचा दंड सुद्धा लावलेला नाही. परंतु बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या गरीब युवकांना हजारो रुपये दंड हे सरकार आणि प्रशासन लावत असल्याचा आरोप बघतोय रिक्षावाला यांनी सरकरावर केला आहे.