न्हावरे : चासकमान डाव्या कालव्याचे आवर्तनाचे पाणी टेल टू हेड सोडावे, यासाठी शिरूरच्या पूर्वभागात न्हावरे तसेच आंबळे (ता.शिरूर) येथील शेतकऱ्यांनी एकाच वेळी शिरूर-चौफुला हा राज्यमार्ग अडवून तासभर रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे संबंधित प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने अनेक वाहनचालक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती.या आंदोलनामध्ये उपसरपंच सागरराजे निंबाळकर, अपंग मित्र मंडळाचे अध्यक्ष पोपटराव थिटे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुभाष कांडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव जाधव, माजी सरपंच संभाजी बिडगर, अरुण तांबे, शरद पवार, विघ्नहर पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी खंडागळे, न्हावरे सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश बहिरट, सुरेश खंडागळे, विश्वासराजे निंबाळकर, सुरेश कोरेकर, जगन्नाथ मोरे, गणेश दरेकर, रणजित गेलोत, युवराज निंबाळकर, अनिल ठिकेकर, अमोल गावडे, अनिल जाधव, भास्करराव भोंडवे, अमोल कांगुणे, दीपक खंडागळे आदी शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)‘टेल टू हेड’चा नियम डावललागेल्या काही दिवसांपासून शिरूर व खेड तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन चासकमानच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडले आहे. मात्र, टेल टू हेड हा पाणी सोडण्याचा नियम डावलून संबंधित अधिकारी मध्येच पाणी सोडत आहेत. पाणी जर वरच्याच भागात प्रथम सुटले, तर टेलकडील भागात पाणी केव्हा जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही आवर्तनांमध्ये टेलकडील भागावर सतत अन्याय केला जात आहे. याला जबाबदार अधिकारी व कर्मचारी वर्गच आहे. गुन्हे दाखल कराटेल भागाकडील शेतकरी -अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीव्र नाराज आहे. यांच्यामुळेच न्हावरे परिसरावर अन्याय होत आहे व त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. किमान या आवर्तनात पाणी सर्वांना मिळेल, ही अपेक्षा होती. परंतु वरच्याच भागात पाणी मुरत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याने आज शिरूर-चौफुला रस्त्यावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा व गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिरूरचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे संतप्त अधिकाऱ्यांनी केली.
तासभर रस्ता रोखला
By admin | Published: May 15, 2016 12:44 AM