बारामती : बारामती प्रवासासाठी खासगी वाहन मालकांकडून प्रचंड लूट सुरु आहे. नॉन एसी गाड्या, मिनीबस 300 रुपये/प्रवासी आकारत आहेत. प्रवासाचे तिकीट देण्यात येत नसून तशी मागणी केल्यास प्रवास नाकारण्यात येतोय. यामुळे बारामतीतील नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी अजित दादांकडे प्रवाशांची लूट थांबवण्याची विनंती ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे हाल संपण्यास तयार नाहीत. वाहतुकीसाठी प्रवाशी मिळेल ते वाहन, मागतील तेवढे पैसे मोजुन प्रवास करीत आहेत. बारामती आगारात दिवसभरात हे चित्र दिसून आले. त्यामुळे ना आरक्षण,ना हाफ तिकीट,ना पास आकारतील त्या पैशात प्रवास करावा लागत असल्याची प्रतिक्रीया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
मध्यमवर्गीयांनी एसटीचे तिकीट खर्च गृहित धरुन कुटुंबाचे आर्थिक गणित आखलेले असते. मात्र,खासगी चढ्या भावामुळे हे गणित कोलमडले आहे. अडकलेल्या प्रवाशांना परत सोडण्यासाठी नातेवाईक दुचाकी, चारचाकीचा वापर करीत घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे डिझेल, पेट्रोल, सीएनजी पंपावर रांगा लागल्या आहेत. प्रवाशांना थेट प्रवासासाठी वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशी मिळेल त्या वाहनाने टप्प्याने प्रवास करीत आहेत. परिणामी प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
बारामतीत प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये यासाठी खाजगी वाहनचालकांना आगारातून वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरत आहेत. संबंधित वाहनांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. टुरीस्ट बस, तवेरा, इंडीका, मारुती ओम्नी, मारुती ओम्नी, टेम्पो ट्रॅक्स, बोलेरो आदी खासगी वाहने प्रवासासाठी उतरली आहेत.
बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी एसटीला १३५ रुपये तिकीट आहे. मात्र, बारामतीहुन पुण्याला जाण्यासाठी अडवणुक करुन प्रवाश्यांकडुन ३०० ते ४०० रुपये आकारणी केली जात आहे.
खासगी प्रवासाचे दर
बारामती—दौंड—२०० रुपयेबारामती—फलटण—१०० रुपयेबारामती—इंदापुर—२०० रुपयेबारामती—सातारा—४०० ते ५०० रुपयेबारामती—पुणे—४०० रुपये.