पुणे : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू असं वक्तव्य केलंय. ही एक धमकी असून कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केलीये. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यावरच पुण्यात शिवसैनिकांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलंय.
''भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रथम शहराची हद्द जाणून घ्यावी. खासदार संजय राऊत हे गणेशोत्सवात पुण्यात येणार आहेतच. त्यावेळी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास, शिवसेना स्टाईलनेच राऊत यांचे स्वागत करण्यासाठी येणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करू, असं प्रत्युत्तर शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय.''
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापािलकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे आदी उपस्थित होते.
संजय राऊत पुणे दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी खोचक टीका केली होती. आमच्या पाठीत खंजीर खुपसला असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला उत्तर देत खासदार संजय राऊत यांनी “आम्ही खंजीर खुपसत नाही तर समोरून कोथळा बाहेर काढतो” असं म्हटलं होतं. या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने डेक्कन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती.
काय म्हणाले होते जगदीश मुळीक...
“संजय राऊत हे केवळ एक बोल बहाद्दर आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करत असतात. ते प्रत्यक्ष फिल्डवर कधीही काम करत नाहीत. त्यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमतदेखील नाही. कोथळा बाहेर काढू ही एक प्रकारे धमकी आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे राऊत यांनादेखील अटक करावी”. “जर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभरात आंदोलन केले जाईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.