पुणे : रस्त्यावर बोलत उभे असलेल्या मित्रांशी टोळक्याची भांडणे सुरु असताना मध्ये पडलेल्या एकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करून आमच्या भांडणामध्ये येतो का? थांब तुला खल्लास करतो अशी धमकी देत त्याच्यावर टोळक्याने कोयत्याने वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. बुद्धविहार पानमळा वसाहत येथे रात्री अडीच च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन ते चार जणांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील एका सराईत गुन्हेगार आहे.
एका ३१ वर्षीय तरुणाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुद्धविहार पानमळा वसाहत येथे त्यांच्या मित्रांबरोबर बोलत उभे होते. टोळक्याने फिर्यादीच्या मित्रांशी भांडणे सुरु केली. भांडणांमध्ये पडलेल्या फिर्यादींना टोळक्याने धक्काबुक्की व शिवीगाळ करीत फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करीत असताना फिर्यादीने कोयता हातात पकडला. त्याचा राग धरून टोळक्याने फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांचे मित्र त्यांना वाचविण्यासाठी मध्ये आले असता त्यांना कोयता दाखवून कुणी मध्ये आले तर सोडणार नाही अशी धमकी देत दहशत पसरविण्याचा टोळक्याने प्रयत्न केल्याने टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.