हरिभाऊ बागडे : शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माणसाचा जगण्याचा आधार शेती आहे. तसेच शेती पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करायला हवा. निसर्गाचे पडलेले पाणी अडवले पाहिजे. त्यासाठी केवळ विशिष्ट जागा पाहून तिथेच पाणी न अडवता. जिथे पाणी पडेल तिथेच आडवा. भूजलात पाणी जिरले तरच नद्या खळाळून वाहतील, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे यांनी पुणे येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र विकास केंद्र जल जागरूकता अभियान अंतर्गत शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सपत्निक सन्मान विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोमुख ट्रस्टचे अध्यक्ष विजय परांजपे, महाराष्ट्र विकास केंद्राचे अनिल पाटील, शरद मांडे आदी उपस्थित होते.
''महाराष्ट्राचे भूजल'' या चर्चासत्रात भूजल अभ्यासक श्रीनिवास वडगबाळकर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे राज्य समन्वयक धोंडीराम वारे यांनी याप्रसंगी विचार मांडले. या वेळी जलसाक्षरता विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
हरिभाऊ बागडे म्हणाले, महाराष्ट्र अन्न-धान्यात स्वयंपूर्ण नाही. आपण केवळ साखर, कापूस यात स्वयंपूर्ण आहोत. आपल्याला मूलभूत गरजा भागविण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी खूप काम करावे लागणार आहे. त्यासाठी शासन अथवा खासगी स्तरावर नियम धरून चालणार नाही. तर लोकांचे समाधान कशात आहे. ते पाहून त्यासाठी नियम बाजूला ठेवून काम करावे लागणार आहे.
श्रीनिवास वडगबाळकर म्हणाले, की देशातील धारणांपैकी एकूण ४० टक्के धरणे आपल्या महाराष्ट्रात आहे. मात्र, तरीही परिस्थिती बदलली नाही. भूजलचे खडक आणि वाळू हे दोनच प्रकार आहे. त्यामुळे पाणी साठवणे, भूजल वाढवणे यासाठी काम करावे लागेल. त्याचबरोबर साठवलेल्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागेल.
----
भूजल पातळी वाढवण्यासाठी राज्यात खूप काम करण्याची गरज : खानापूरकर
धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात काम करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा मोठा सन्मान केला. मात्र, हा माझा एकट्याचा सन्मान नसून यासाठी माजी आमदार अमरीश पटेल यांनी मोठे अर्थसहाय्य केले. तसेच माझी पत्नी माधुरी खानापूरकर यांनी मोठे पाठबळ दिले. हा पुरस्कार त्यांना अर्पण करतो, असे सांगून सुरेश खानापूरकर म्हणाले, की नोकरीनिमित्त मी महाराष्ट्रभर फिरलो. राज्यातील बहुतांश धरणाचे पाणी हे शहर आणि उद्योगांना दिले जात आहे. भविष्यात त्यामुळे शेतीला पाणी मिळणार नाही. पावसाचे पडणारे पाणी प्रत्येक गावागावाला कसे पुरेल यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. विशेषतः विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यात खारपण पट्टा मोठा आहे. तिथे भूजलात पाणी जिरत नाही. त्याठिकाणी पाणी जिरावण्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावी लागेल.
फोटो ओळ : शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सपत्निक सन्मान विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विजय परांजपे, श्रीनिवास वडगबाळकर, धोंडीराम वारे, अनिल पाटील, शरद मांडे आदी उपस्थित होते.