यवत : दौंड तालुक्याचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पाण्याबाबत सुरू केलेले राजकारण थांबवावे, असे मत जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी व्यक्त केले आहे.दौंड तालुक्याच्या शेतीच्या पाण्याबाबत माजी आमदार रमेश थोरात यांनी तालुक्यातील जनतेला चुकीची महिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माऊली ताकवणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.या पत्रकात त्यांनी माजी आमदार थोरात त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे बोलत असून त्यांच्या आवडत्या म्हणीप्रमाणे एक हात लाकूड आणि नऊ हात ढपली याप्रमाणे तेच स्वत: वागत आहेत. दौंड तालुक्याला आतापर्यंत खडकवासला कालव्याची तीन आवर्तने पूर्ण झाली असून चौथे आवर्तन तालुक्याला मिळणार आहे. परंतु माजी आमदार थोरात हे दोन आवर्तने दिली असून तिसरे आवर्तन देण्याबाबत सांशकता आहे, असे म्हणतात. म्हणजेच काय, की पाण्याबाबत राजकारण करून तालुक्याची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र तालुक्यतील जनता आता त्यांना भुलणार नाही. वास्तविक थोरात आमदार असताना त्यांच्या कार्यकाळातच तालुक्याला मिळणारी आवर्तने कमी झाली असून त्यांच्या काळात दोन ते तीन आवर्तने येत होती. राहुल कुल दौंड आमदार झाल्यापासून त्यांनी सातत्याने शेतीच्या पाण्यासाठी पाठपुरावा करत तालुक्याला मिळणाऱ्या आवर्तनात वाढ करत आता चौथे आवर्तन तालुक्याला मिळवून दिले. (वार्ताहर)
पाण्याबाबतचे राजकारण थांबवावे : ताकवणे
By admin | Published: April 24, 2017 4:30 AM