मंचर : शेतमालाला योग्य भाव मिळाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी खरेदी बंद पाडून मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. व्यापारी व खरेदीदार यांनी संगनमत करून तरकारी मालाचे बाजारभाव कमी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या वेळी केला. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.राज्य सरकारने तरकारी व फळे नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्यापारी व अडते यांनी संप पुकारला होता. बुधवारी संप मागे घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी बाजार समितीचे कामकाज सुरू झाले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध फळभाज्यांची आज चांगली आवक झाली. दुपारी व्यवहार सुरू झाले, तेव्हा शेतमालाला कमी बाजारभाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. गवारीला १० किलोंना ३०० रुपये बाजारभाव मिळत असताना आज १५० ते २०० रुपये भाव मिळाला. इतर मालालाही मागील विक्रीपेक्षा कमी भाव मिळत होता; त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर व उपस्थित शेतकऱ्यांनी खरेदीचे व्यवहार बंद पाडले. या वेळी घोषणा देण्यात आल्या.बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपसभापती गणपतराव इंदोरे, संचालक दत्ता हगवणे, सागर थोरात, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब मेंगडे आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेतले. व्यापाऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळेल, अशा पद्धतीने मालाची विक्री करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर पुन्हा व्यवहार सुरू झाला; मात्र तरीही बाजारभावात फारशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा संतप्त झाले. शेतकऱ्यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद पाडले. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जाऊन पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यांना बाजार समितीच्या आवारात नेले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपसभापती गणपतराव इंदोरे यांनी पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाचा कडता कापू नये, लिलाव पद्धतीने मालाची विक्री करावी तसेच शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न झाला, तर बाजार समिती कारवाई करेल, असा इशारा सभापती देवदत्त निकम यांनी या वेळी दिला. तरकारीचे व्यवहार सुरू असताना बाजारभाव जेमतेम राहिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
भाव कमी झाल्याने मंचरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Published: July 15, 2016 12:33 AM