लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : गेल्या अकरा दिवसांपासून महावितरण कंपनीने नगर परिषदेच्या हद्दीतील खंडित केलेल्या पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक व कार्यकर्ते यांनी गुरुवारी सकाळपासून पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, महावितरण कंपनीचे सहायक अभियंता यांच्या कार्यालयात व बाहेर दिवसभर ठिय्या आंदोलन केले.महावितरणचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांना दिवसभर घेराव घालून एकामागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती करत कार्यकर्त्यांनी शब्दश: धारेवर धरले. पथदिव्यांच्या वीजपुरवठ्यासंदर्भात महावितरणचे अधिकारी वा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठोस लेखी पत्र घेतल्याशिवाय त्यांना मोकळे सोडणार नाही, असा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. महाराष्ट्र दिनापासून शहरातील सर्व पथदिवे बंद आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी सहायक अभियंत्याच्या कार्यालयात व बाहेरच्या आवारात ठिय्या मारला. अर्ध्या तासाने महावितरण कंपनीचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे आले. भरत शहा म्हणाले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा होत असताना, त्यांनी नगर परिषदेच्या थकबाकीचे टप्पे पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे सोपवली होती. टप्पे होणे अथवा शिष्टमंडळाने बावनकुळे यांच्यासमोर ठेवलेल्या प्रस्तावावर विचार होण्याआधीच पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद ठेवला आहे, तो कोणत्या अधिकाराखाली, कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशाने बंद ठेवला यासंदर्भात लेखी पत्र द्यावे. यावर घुमे यांना कसलेही उत्तर देता येईना. पिसाळलेले कुत्रे चावण्याची घटना रात्री घडली असती. अथवा इतर अप्रिय घटना घडली असली तर याला जबाबदार कोण ठरले असते, अशी विचारणा नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केली. प्रमोद राऊत,सुनील तळेकर यांनी ही घुमे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
पथदिव्यांच्या विजेसाठी रास्ता रोको
By admin | Published: May 12, 2017 4:59 AM