लासुर्णे : सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटात नियमित वीजबिल भरूनदेखील भारनियमन सुरू आहे. वीजबिल वसुलीच्या या नावाखाली दिवसातून दोन वेळा भारनियमन होत असल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे लासुर्ण्यातील ग्रामस्थांनी येत्या तीन दिवसांत तोडगा काढावा. अन्यथा जंक्शन कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटातील लासुर्णे गणात गेली कित्येक दिवस वीजबिल वसुलीसाठी, तसेच वरूनच भारनियम सुरू असल्याचे सांगण्यात येते. दिवसातून दोन वेळा भारनियमन केले जात आहे. यासाठी लासुर्णे ग्रामस्थांनी बरीच वेळा आंदोलने केली. परंतु त्यानंतर भारनियमन बंद केले जाते. नंतर १० ते १५दिवसांनंतर पुन्हा भारनियमन सुरू करण्यात येते, असा येथील ग्रामस्थांचा अनुभव आहे. लासुर्णेपासून १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जंक्शन परिसरात औद्योगीकीकरणाच्या नावाखाली भारनियमन होत नाही. जंक्शनप्रमाणेच लासुर्णेत भारनियमन थांबवून सलग वीजपुरवठा करावा. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना नियमित वीजपुरवठा व्हावा. याबाबत महावितरणने तीन दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढावा; अन्यथा जंक्शन कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा बारामतीचे मुख्य अभियंता इरवाडकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. गजानन वाकसे, दीपक लोंढे, महादेव जामदार, अनिल गायकवाड, सतीश दडस, तुकाराम देवकाते, दीपक सरगर, अरुण गायकवाड, माऊली कोळेकर, आनंद लोंढे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. या सततच्या होणाऱ्या भारनियमाला कंटाळून या भागातील व्यापारीवर्ग, तसेच गावठाण परिसरातील छोटे लघुउद्योजक यांनाही फटका बसत आहे. या आंदोलनात व्यापारीवर्गही सहभागी होणार असल्याचे लासुर्णे येथील व्यापारी सचिन गांधी यांनी सांगितले. (वार्ताहर)
सणसर-लासुर्णेतील भारनियमन थांबवा
By admin | Published: November 05, 2014 5:43 AM