- राजू इनामदारपुणे - प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील वादात महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल १३ डॉक्टरांची नेमणूक गेले काही महिने अडकली आहे. आधीच आरोग्य विभागाला आरोग्य विभागाचे पदच गेले दोन वर्षे नाही, त्यात या १३ डॉक्टरांची नियुक्ती रखडल्यामुळे या विभागाची कार्यक्षमता थंडावली आहे.महापालिका आयुक्तांनी मुलाखती घेऊन नावे निश्चित केलेल्या यादीला महिला बाल कल्याण समितीची मान्यताच मिळत नसल्याने सर्व प्रक्रिया झाल्यानंतरही या डॉक्टरांना नियुक्ती देणे प्रशासनासाठी अडचणीचे झाले आहे. निवड झालेले हे उमेदवार डॉक्टरही त्यामुळे वाट पाहून त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर प्रशासनालाही आता या विषयात काय करावे असा प्रश्न पडला आहे. निवड केली कशी, त्याची माहितीच नसल्यामुळे समितीकडून त्याला मान्यता मिळत नाही असे दिसते आहे.महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्डिओलॉजिस्टसह विविध विषयांतील तज्ज्ञांची अनेक पदे आहेत. त्या त्या विभागाची उपकरणेही रुग्णालयात आलीत. काही कोटी रुपयांची तरतूद करून महापालिकेने ही खरेदी केली आहे. गरीब नागरिकांना त्याचा लाभ होईल असा दावाही त्या त्या वेळी पदाधिकारी व प्रशासनाने केला आहे. अशा तज्ज्ञांची सुमारे १३ पदे काही महिने रिक्त होती. ती भरलीच जात नव्हती. त्यामुळे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असूनही केवळ तज्ज्ञांअभावी त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. काही उपकरणांवरील तर प्लॅस्टिकचे आवरणही काढलेले नाही. रुग्णालयात उपकरणे आली तेव्हापासून ती विनावापर पडून आहेत.अखेर प्रशासनाने महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखपदासह या अन्य रिक्त पदांसाठीही जाहिरात दिली. त्यात आरोग्य विभागप्रमुख पदाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही, मात्र अन्य १३ पदांसाठी सुमारे ११३ अर्ज आले. त्यांची महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही तज्ज्ञांसमवेत मुलाखत घेतली. त्यातून १३ पदांसाठी १३ नावे निश्चित केली. महापालिकेने जाहिरातीत दिलेले सर्व शैक्षणिक तसेच अनुभवाचे निकष पार केलेले उमेदवारच यात निवडण्यात आलेले आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेत काम करताना लागणारे निकषही त्यांना लावण्यात आलेले आहेत.नावे निश्चित झाल्यानंतर ही यादी मान्यतेसाठी म्हणून महिला बाल कल्याण समितीकडे देण्यात आली. मात्र त्यांनी त्याला मान्यता देण्याऐवजी विषय प्रलंबित ठेवला आहे.जाहिरात कधी दिली, निवड कशी केली, मुलाखती कोणी घेतल्यायाची काहीही माहिती नसताना थेट निवड झालेल्या उमेदवारांची नावेच समोर आली. त्यामुळे प्रक्रियेची माहिती द्यावी अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. प्रशासन आता त्यासाठी उमेदवारांच्या अर्जासह सर्व माहिती त्यांना देण्याच्या विचारात आहे.आरोग्य अधिकाºयांचे पद रिक्तचआरोग्य विभाग प्रमुख पदासाठी विशेष अर्ज आले नाहीत. जे आले त्यातील दोनच पात्र ठरले. स्पर्धा होत नाही म्हणून मुदतवाढ देण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या नियुक्त्याच होत नसल्यामुळे प्रमुखपदाची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही रखडली आहे, असे राणी भोसले यांनी सांगितले.प्रशासनाने यात चूक केली आहे. विषयाची आधी कल्पनाही तरी द्यायला हवी होती. ती दिली नाही, त्यामुळेच समिती सदस्यांनी प्रक्रियेची माहिती मागितली आहे. या सर्व १३ नियुक्त्या कायमस्वरूपी व आरोग्यासारख्या संवेदनशील विभागातील आहेत. त्यामुळे प्रशासनाने माहिती द्यावी, त्यानंतर महापौर, सभागृह नेते आदी वरिष्ठांबरोबर चर्चा करून मान्यता देण्यात येईल. नियुक्त्या अडवण्याचा काही प्रश्नच नाही. योग्य पद्धतीने विषय समोर आला असता तर प्रलंबित राहिलाच नसता- राणी भोसले, अध्यक्ष,महिला बाल कल्याण समिती, महापालिका
डॉक्टरांच्या नेमणुकीला आडकाठी, प्रशासन त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:26 AM