पुणे : कोरोनावरील लस कधी येणार, त्याचे वितरण कसे होणार ? याबाबत सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता आहे. जिल्हा पातळीवर लसींची साठवणूक क्षमता, शीतगृहांची व्यवस्था यांच्या तयारीला वेग आला आहे. सध्या पुणे जिल्ह्याची क्षमता ५२ हजार लिटर इतकी आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचा-यांची माहिती संकलित करण्यात आली असून, लसीकरण कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे.
कोणत्याही लसीची साधारणपणे २ ते ८ डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये साठवणूक, वाहतूक आणि वितरण केले जाते. प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा आणि विभाग स्तरावर लसींच्या साठवणुकीची व्यवस्था केलेली असते. त्यासाठी आईस लाईन रेफ्रिजरेटर, वॉक इन कूलर आणि डीप फ्रीजर सज्ज असतात. तालुका स्तरावर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साठवणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. व्हॅक्सिन व्हॅन आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वाहनांमधून लसीचे वितरण केले जाणार आहे. एका व्हॅक्सिन व्हॅनमधून तीन ते चार तालुक्यांना लसींचे वितरण केले जाऊ शकते.
सध्या आरोग्य विभागाकडे १० लाख डोस साठवण्याची क्षमता आहे. कोरोनाची लस आल्यावर त्याची साठवणूक, वाहतूक, वितरण यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. साठवणूक क्षमता दुप्पट करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाशी संपर्क साधण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
----------------
लसींच्या साठवणुकीसाठी आईस लाईन रेफ्रिजरेटर, वॉक इन कूलर आणि डीप फ्रीजरची व्यवस्था केलेली असते. एका रेफ्रिजरेटरमध्ये अंदाजे ५-६ हजार डोस स्टोअर केले जाऊ शकतात. सध्या जिल्ह्याकडे ३२९ आईस लाईन रेफ्रिजरेटर आणि २६० डीप फ्रीझरची व्यवस्था उपलब्ध आहे. डीप फ्रीजरमध्ये आईस पॅक तयार केले जातात. आईस पॅकमधून लसींची वाहतूक केली जाते.
--------------------
लसींच्या साठवणुकीसाठी जिल्हा स्तरावर आईस लाईन रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजरची तयारी करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचा-यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लसीकरण कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचे काम १७ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी