पुणे : विमाननगर येथे कश्मिरी सोफ कंपनीसमोर नुकतेच लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले अत्याधुनिक स्वच्छतागृहच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. बीआरटी मार्गावरील साहित्य चोरीला जाणे, सार्वजनिक नळकोंडाळ्यांची चोरी होणे, या बाबी नित्याच्याच आहेत. मात्र, आता काही दिवसांपूर्वीच बांधलेले अत्याधुनिक स्वच्छतागृहच चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. स्वच्छतागृहाची चोरी झाल्याचे उजेडात आल्यानंतरही नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने काहीच कार्यवाही केली नव्हती. मोहल्ला कमिटीच्या बैठकीत विमाननगर येथील ज्येष्ठ नागरिक व मोहल्ला कमिटी सदस्य मारुती सैल यांनी या स्वच्छतागृहाबाबत विचारणा केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.नुकतेच बांधण्यात आलेले स्वच्छतागृह कोणाच्या परवानगीने व का काढण्यात आले, याचा खुलासा करावा, अशी मागणी मारुती सैल यांनी केली होती. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत स्वच्छतागृहाचा शोध लागत नसून याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने यांनी माहिती अधिकारांतर्गत या स्वच्छतागृहाची तपशीलवार माहिती काढली. त्यानुसार नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये पुरुष व महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी निविदा काढली होती. विमाननगर भागात या स्वच्छतागृहाच्या कामासाठी आदित्य कन्स्ट्रक्शन ठेकेदारास हे काम देण्यात आले. ठेकेदाराने १२ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत स्वच्छतागृह बांधून दिले. या पोटी ठेकेदारास २ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे.
स्वच्छतागृह गेले चोरीला
By admin | Published: October 05, 2015 2:00 AM