पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, येत्या ४८ तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. येत्या ८ डिसेंबरला ते दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.गुजरातकडे गेलेले ओखी वादळ बुधवारी सकाळी विरले. या वादळामुळे गुजरात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत डहाणू ११०, मुंबई ८०, सांताक्रूझ ५०, माऊंट आबू, सुरत, नाशिक, बडोदा, कारवार, अहमदाबाद, वेंगुर्ला येथे प्रत्येकी १० मिमी पावसाची नोंद झाली होती.सुमात्रा बेट आणि दक्षिण अंदमान समुद्राजवळ रविवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो आता आंध्र किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. सध्या बुधवारी सायंकाळी हा कमी दाबाचा पट्टा मच्छलीपट्टणमपासून १०२० किमी तर, गोपाळपूरपासून ११०० किमी अंतरावर होता. पुढील ४८ तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. नंतर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून ८ डिसेंबर सायंकाळी ते उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, अंदमान निकोबार द्वीपसमूह येथील अनेक ठिकाणी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात समुद्र खवळलेला राहणार असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, अंदमान, निकोबार बेटे येथील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.ओखी चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ ते ८ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. मराठवाड्यात २ ते ७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९़८ अंश सेल्सियस नोंदविले गेले.पुणे शहरात बुधवारी अधूनमधून ढगाळ हवामान होत. कमाल व किमान तापमानातील अंतर कमी झाल्याने त्याचा त्रास लोकांना जाणवत होता. कमाल व किमान तापमान अनुक्रमे २७.६ आणि २१.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान सरासरीपेक्षा १़७ अंशाने कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ८.७ अंश सेल्सिअस अधिक होते. डिसेंबरमध्ये पुणे शहरातील किमान तापमान २१ अंशाच्या पुढे जाण्याची ही गेल्या काही वर्षातील पहिलीच वेळ आहे.
बंगालच्या उपसागरात वादळ, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 9:35 PM