पुणे : शहरात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या झाडपडीमुळे हडपसरसह आसपासच्या भागातील १६ वीज खांब पडले. तर त्यावरील वीज वाहिन्याही तुटल्या. त्यामुळे २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेमधून १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे.हडपसर औद्योगिक वसाहतीमधील हेन्ले २२ केव्ही उपकेंद्रामधून रामटेकडी, सेंट मेरी, हेन्ले १ व २ अशा २२ केव्हीच्या चार ओव्हरहेड वाहिन्यांद्वारे हडपसर गाव, हडपसर मार्केट, साडेसतरानळी, सातववाडी, शिंदेवस्ती, रामटेकडी, सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, बी. टी. कवडे रोड आदी परिसरात वीजपुरवठा केला जातो. शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसामुळे चारही वीजवाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या. त्यामुळे १६ खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंता व कर्मचाºयांनी घटनास्थळांवर धाव घेत खाली पडलेल्या वाहिन्या दूर केल्या. मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनीही सूचना करून पर्यायी व्यवस्थेतून संबंधीत परिसरात वीजपुरवठा सुरूकरण्याचे निर्देश दिले व कोसळलेले वीजखांब व वाहिन्या उभारण्यासाठी तातडीने काम सुरू करण्यास सांगितले.शिवाजीनगर, रास्ता पेठ, पिंपरी विभागात काही ठिकाणी वीज खंडितशिवाजीनगर, रास्तापेठ व पिंपरी विभागातील वीजपुरवठा काही ठिकाणी खंडित झाला होता. फातिमानगर, शिंदेछत्री, एनआयबीएम रोड, लुल्लानगर, रहेजा गार्डन, कोंढवा, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वाकड रोड, कस्पटेवस्ती, जगताप डेअरी, शितोळेनगर, ताथवडे आदी परिसरात झाडे, फांद्या पडल्याने तसेच काही फलके वादळाने उडून वीज तारांवर आदळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.शिवाजीनगर, रास्तापेठ विभागातील सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर पिंपरीमधील जगताप डेअरी, वाकड रोडचा काही परिसर, शितोळेनगरमधील वीजपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. पर्यायी व्यवस्थेमधून वीज उपलब्ध करून देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वादळाने विजेचे १६ खांब जमीनदोस्त; हडपसर, मगरपट्टा परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 6:40 AM