काल रात्री अचानक वादळी वारा बेफाम सुरू झाला. त्यामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच बंद करण्यात आला होता. येथे बहुतांश शेतकऱ्यांकडे आंब्याच्या बाग आहेत. येथील शेतकरी सीताराम देवकर यांची हापूस, केशरी, रत्नागिरी आणि राजापुरी वाणाच्या सुमारे २०० आंब्यांच्या झाडांची बाग आहे. तसेच तुकाराम देवकर, नाथा देवकर, रामदास देवकर, पोपट कोतवाल, शिवाजी कोतवाल,बबन कोतवाल,साहेबराव कोतवाल,दत्तू भांबेरे या शेतकऱ्यांच्या पण फळबाग आहेत. आंब्याची बाग नुकतीच पाडाला लागायला सुरुवात झाली होती. अजून आंबे विक्री करण्यासाठी तोडले नाहीत. सोसायट्या वाऱ्यामुळे बागेत कैऱ्यांचा सडा पडला होता. यावर्षी मार्केटमध्ये आंबा खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आणि बाजारभाव पण खूप चांगला आहे, त्या अनुषंगाने किमान तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पण वादळामुळे कैऱ्या कच्च्या असतानाच झाडावरून पडून फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाली असल्याचे सीताराम देवकर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात कोणत्याही शेतमालाची विक्री झाली नाही. बराच शेतमाल शेतातच वाया गेला त्यात आता वादळाच्या तडाख्यात हातातोंडाशी विक्रीस आलेल्या आंब्याच्या फळबागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. शेतकरीवर्ग या नुकसानीतून सावरला जावा म्हणून शासनाने रीतसर पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी संतोष आग्रे यांनी केली आहे.तसेच परिसरातील अनेक शेतकरी वर्गाचे कैऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे सीताराम देवकर यांच्या झाडाच्या कैऱ्यांचा सडा खाली पडलेला दिसत आहे.