माळेगाव: भाजी मंडईतील जागेवरून दोन विक्रेत्यांमधे तुफान हाणामारी झाली. दोन्ही विक्रेत्यांनी एकमेकांविरुद्ध परस्पर तक्रारी दाखल केल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपंचायत माळेगाव येथील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या जुन्या बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजीमहाराज चौकात भाजी व फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यापूर्वी गावातील सर्व अतिक्रमण प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी काढले होते. या भागात सूचना फलक देखील उभारून अतिक्रमण केल्यास कारवाई करू, असा इशारा दिलेला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात जागेवरून वाद झाल्याने दोन विक्रेते व त्यांची मुले यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले व दुकानातील भाजीमंडई रस्त्यावर फेकून देण्यात आली. या वेळी बघ्यांची गर्दी उसळली होती. दरम्यान, या भांडणावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर हे बारामतीहून नीरा रस्त्याने जात असताना त्यांनी थांबून हे भांडण मिटवले. तसेच पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
माळेगाव पोलीस दूरक्षेत्रात पूजा राजाराम करचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरबान इलाहीबक्ष बागवान, अरमान कुरबान बागवान, सलमान कुरबान बागवान, शाहिद फिरोज बागवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कुरबान इलाहीबक्ष बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार राजाराम करचे, महादेव मुरलीधर करचे, महेश महादेव करचे, उमेश महादेव करचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत. दरम्यान, मंडईसाठी नेमून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावेत. अन्यथा, संबंधित व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिला आहे.
माळेगावमधील दोन विक्रेत्यांमध्ये जागेवरून भांडणे झाली.
०६०९२०२१-बारामती-०८