- विवेक भुसेपुणे : अरबी समुद्रात या हंगामात सर्वाधिक चार चक्रीवादळे निर्माण झाली असून, त्यातील ‘क्यार’ हे महाचक्रीवादळ तब्बल १२ वर्षांनंतर निर्माण झाले आहे. यापूर्वी २००७ मध्ये अरबी समुद्रात गोनू हे महाचक्रीवादळ निर्माण झाले होते. या वेळेप्रमाणे तेव्हाही ते ओमानच्या किनारपट्टीला धडकले होते. सध्या अरबी समुद्रात एकाचवेळी ‘क्यार’ आणि ‘माहा’ ही दोन चक्रीवादळे निर्माण झाली असून, एकाचवेळी अरबी समुद्रात दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अरबी समुद्रात गेल्या आठवड्यात २४ ऑक्टोबरला रत्नागिरीपासून ३६० किमी अंतरावर ‘क्यार’ हे चक्रीवादळ निर्माण झाले. त्याचे पुढे महाचक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ जरी निर्माण झाले असले, तरी त्याची दिशा ही ओमानच्या किनारपट्टीकडे असल्याने त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्र, गोवा किनारपट्टी वगळता जाणवला नाही. कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर, ते भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्याने त्याचा आपल्या किनारपट्टीला धोका झाला नाही.
सध्या ‘क्यार’ मुंबईपासून १३५० किमी दूर गेले असून, महाचक्रीवादळाचे आता पुन्हा चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. १ नोव्हेंबरला ते ओमानच्या किनारपट्टीजवळ जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान ३० ऑक्टोबरला लक्षद्वीप बेटांजवळ ‘माहा’हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी ते केरळमधील तिरुअनंतपुरमपासून २७० किमी अंतरावर होते. एकाचवेळी अरबी समुद्रात दोन चक्रीवादळे असण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी दुपारी ते केरळमधील कोझीकोडीपासून ३३० किमी अंतरावर समुद्रात होते. गेल्या ६ तासांपासून ते ताशी १७ किमी वेगाने उत्तर-उत्तर पश्चिमेच्या दिशेने जात आहे. पुढील १२ तासांत ते तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ४ नोव्हेंबरपर्यंत राहणार असून, त्यानंतर ते क्षीण होत जाणार आहे. यामुळे लक्षद्वीप समूहातील बेटांवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच, दक्षिण भारताच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जर ही चक्रीवादळे पश्चिम किनारपट्टीला धडकली असती तर?सुदैवाने ही दोन्ही चक्रीवादळे ओमानच्या दिशेने जात असल्याने त्याचा मोठा दुष्परिणाम पश्चिम किनारपट्टीवर झाला नाही. पण, ती पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने आली असतील तर, असे विचारता पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, ही दोन्ही चक्रीवादळे आपल्या पश्चिम किनारपट्टीवर धडकली असती़, तर मोठी आपत्ती आली असती. सध्या आपल्याकडे अधिक अत्याधुनिक यंत्रणा आणि न्युमेरिकल मॉडेल आहे. उपग्रहांद्वारे मिळणारी निरीक्षणे याचा उपयोग होतो. तसेच, दिल्लीत रिजनल स्पेशलाईज मेट्रॉलॉजी सेंटर फॉर ट्रॉफिकल सायक्लोन ओवर नार्थ इंडियन ओशन ही संस्था चक्रीवादळाचा सातत्याने अभ्यास करीत असते. या संस्थेचे भारतालगतचे ८ देश सदस्य आहेत. ‘क्यार’ चक्रीवादळ निर्माण झाले़ तेव्हा त्याची सुरुवातीला आपल्या किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल दिसत होती. मात्र, त्याचवेळी अत्याधुनिक साधने व मॉडेलच्या आधारे हे चक्रीवादळ पुढे महाचक्रीवादळ होणार असून, ते ओमानच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. जर तशी शक्यता दिसली नसती, तर ज्या प्रमाणे ओडिशा येथे चक्रीवादळ येते तेव्हा लाखो लोकांचे स्थलांतर करायची वेळ येते तशी वेळ आपल्याकडे आली असती. सुदैवाने सध्या हवामान विभागाकडे असलेल्या मॉडेलमुळे त्याची दिशा अगोदरच लक्षात आल्याने हा स्थलांतराचा मोठा खर्च व मानवी श्रम वाचले आहेत.
प. बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळयेत्या चार ते पाच दिवसांत पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील चार ते पाच दिवसांत निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढे त्याचे ‘बुलबुल’ या चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.