पुणे: वृद्ध आईवडिलांना आळंदीला सोडायला निघालेल्या रिक्षाचालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर तो समाजात टीकेचा धनी झाला. त्याच्यासह बहुसंख्य रिक्षाचालक देखील शिव्याशापांचे धनी झाले. मात्र त्या चालकाने तो कोणत्या रिक्षा संघटनेचा सदस्य आहे हेही स्पष्ट केले होते. त्यामुळे त्या रिक्षाचालकाची 'व्यथा' उलगडण्यात यश आले आहे.
बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर व उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांनी नावावरून या रिक्षाचालकाचा शोध घेतला. एका खासगी वित्तीय कंपनीकडून कर्ज काढून त्याने रिक्षा घेतली होती. व्यवसाय सुरू होता, बरे चालले होते, मात्र कोरोना टाळेबंदीत त्याचा रिक्षाचा व्यवसाय पूर्ण बंद झाला. घरात खाणारी त्याच्यासह आईवडिल व आठ माणसे. कमावणारा तो एकटाच. सुरूवातीचे काही दिवस शिलकीवर काढले, नंतर मात्र उपासमार होऊ लागली. रिक्षा व्यवसायाला काही अटींवर परवानगी मिळाली तर त्याआधीच त्या कंपनीने कर्जाचे हप्ते थकले म्हणून त्याची रिक्षा ओढून नेली. त्यामुळे मिळाले काम तर दाम नाहीतर उपास असे त्याचे दिवस सुरू होते. ते त्याच्या आईवडिलांना पाहिले जात नव्हते.
आपला भार कमी व्हावा यासाठी त्यांनी स्वत: होऊनच मग भिक्षा मागून जगणे सुरू केले. ते त्याला पहावत नव्हते. त्याने त्यांना घराच्या परिसरात फिरत नका जाऊन म्हणून सांगितले, मात्र वयामुळे त्यांना ते समजत नव्हते. अखेरीस किमान काही दिवसांपुरते त्यांना आळंदीला सोडून येऊ असा विचार त्याने केला व त्याप्रमाणे तो तिथे गेला. नागरिकांच्या गराड्यात सापडला. खोटे काहीही न बोलता त्याने सगळे खरे सांगितले व समाजमाध्यमात तो टिकेचा धनी झाला. संघटनेच्या सदस्यांनी ही सर्व माहिती मिळाल्यावर त्वरेने हालचाल केली. त्याला आर्थिक मदत मिळवून दिली. वित्तीय कंपनीबरोबर संपर्क साधून रिक्षा परत आणली.
कोरोना टाळेबंदी काळात अनेकांवर अशी उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कर्जदार व्याजाच्या हप्त्यांसाठी त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करत आहेत. सरकारने किमान या कंपन्यांच्या बेमुर्वतपणाला आळा घालावा अन्यता अशा घटनांचे प्रकार वाढतील अशी भीती संघटनेने या सर्व प्रकारावर व्यक्त केली.