पुणे : कुठे स्त्रियांच्या कर्तृत्वाची सांगितलेली कहाणी तर कुठे गाण्यांच्या तालावर केलेली आकर्षक रोषणाई. विविध आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून कर्वे रस्ता गणेशभक्तांना आकर्षित करत आहे. सामाजिक जिवंत देखाव्यांबरोबरच डोळे दिपवणारी रोषणाई कलाकृती व तंत्रज्ञान यांचा साधलेला मेळ साधलेला पाहायला मिळतो.एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘उत्सव गणेशाचा आदर स्त्रीशक्तीचा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाने यंदा ७८ वर्षे पूर्ण केली आहेत. सामाजिक देखावे सादर करण्यावर मंडळाचा भर असतो. ६ वर्षांपासून महिलांच्या यशोगाथेवर मंडळ देखावे सादर करते. यंदा मुंबईच्या कल्पना खराटे यांच्या जीवनावर जिवंत देखाव्याद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. दृष्टी गेल्यावरही कल्पना खराटे यांनी जिद्दीने डॉक्टरेट पूर्ण करून केलेल्या संशोेधनाची यशोगाथा या देखाव्यातून मांडण्यात आली आहे.एरंडवणे मित्र मंडळाने ‘श्री स्वामी समर्थ प्रकट दिन’ हा हलता देखावा सादर केला आहे. देखाव्याबरोबरच दररोज गणेशभक्तांना महाप्रसादही मंडळाकडून दिला जातो. मंडळाला ६६ वर्षे पूर्ण झाली असून, नेहमीच हालते देखावे सादर करण्यावर मंडळाचा भर असतो.अमृत मित्र मंडळाने यंदा देखावा म्हणून शिवरथ तयार केला आहे. हे मंडळ नेहमीच धार्मिक देखावे सादर करत असते. यंदा दुष्काळ दूर व्हावा, असे साकडेच शंकराला या देखाव्याच्या माध्यमातून घालण्यात आले आहे.ओंकार मित्र मंडळाने गाण्यांच्या तालावर विद्युत रोषणाई केली आहे. तर अचानक मित्र मंडळाने नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
देखाव्यातून ‘ती’च्या कर्तृत्वाची कहाणी
By admin | Published: September 12, 2016 2:32 AM