पुणे, प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मास्टर्स होमवर येलो (पिवळा सिग्नल) आहे, स्पीड कमी करू का? तेवढ्यात मास्टर्स म्हणतो, नको नको मी स्टार्टर (हिरवा सिग्नल) देतो. इंजीनमध्ये बसलेले वाहतूक निरीक्षक सेक्शन मोकळ्या ठेवण्याच्या आधीच सूचना देतात. गाडीला एक मिनिटांचा देखील उशीर होऊ नये म्हणून नियंत्रण कक्षातील सर्व नियंत्रक डोळ्यांत तेल घालून सर्व ऑपरेशन लक्ष ठेवून असतात. गरजेनुसार स्टेशन मास्टर्स, इंजीन निरीक्षक, वाहतूक निरीक्षक यांना सूचना देतो. तसेच आपापल्या वरिष्ठांना माहिती देतात. कारण एकच कुणाला तरी ‘श्वास’ वेळेत मिळावा म्हणून धडधडत राहतं अनेकांच ‘हृदय’.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशातील आरोग्य व्यवस्था हतबल झाली. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी तडफडत आपला प्राण सोडला. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी रेल्वेने पहिल्यांदाच ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला अन् तो यशस्वी देखील केला. एक ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यासाठी त्या रेल्वे विभागातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागते.
१ सुरक्षेच्या कारणास्तव वेग मर्यादा :
ऑक्सिजन एक्सप्रेसच्या टॅंकरमधून लिक्विड स्वरूपात ऑक्सिजन असतो. तो अतिज्वलनशील आहे. त्यामुळे रेल्वेची लखनऊ येथील आरडीएसओ ह्या संस्थेने ऑक्सिजन एक्सप्रेससाठी जास्तीत जास्त ६५ किमीची वेगमर्यादा दिली. कोणत्याही परिस्थितीत गाडी ६५ च्या वेगपुढे जाणार नाही याचे सक्त आदेश रेल्वे चालकाला असते.
२ रेल्वेने काय काळजी घेतली :
१. सुरक्षेच्या कारणास्तव ऑक्सिजन एक्सप्रेसला विद्युत इंजीन जोडण्यात आलेले नाही. ओएचइमुळे संभाव्य धोका टाळता यावा. २. डिझेल इंजीनवर ही गाडी धावत आहे. डिझेलचे दोन इंजीन जोडले गेले. एक जर बंद पडला तर वेळ वाया जाऊ नये म्हणून दुसरा सोबतच ठेवला.
३. गाडी मार्गातील स्थानकावरून धावताना स्टेशनवरचे सर्व प्लॅटफॉर्म वगळण्यात आहे. कारण प्लॅटफॉर्म वरील शेड टँकर घसण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी मेन लाईन नाही अशा ठिकाणी प्लॅटफॉर्मवरून केवळ ५ ते १० चा वेग ठेवण्याचे निर्देश. मात्र तशी वेळच आली नाही.
४. इंजीनमध्ये इंजीन निरीक्षकची ड्युटी लावण्यात आली. जर इंजीनमध्ये बिघाड झाला तर तो तत्काळ दूर झाला पाहिजे.
५. गाडी सुरू करताना झटके बसू नये म्हणून चालकाला सूचना.