पुणे : झाडाच्या फांदीवरून उंदीर, घुस खिडकीद्वारे घरात येतात आणि आम्हाला त्रास देतात. म्हणून ते झाड तोडून टाका, अन्यथा झाडाची उंची कमीच ठेवा अशा प्रकारचा अजब सल्ला एका नागरिकाने दिला आहे. इमारतीमध्ये ग्राऊंड फ्लोअरवर राहणारे कुटुंब पर्यावरणप्रेमी असून, त्यांनी सोसायटीच्या आवारात अनेक झाडं लावली आहेत. त्यांना त्या नागरिकाने अशा प्रकारचा सल्ला देणारे पत्र हाती थोपविले आहे. ते झाड सोसायटीच्या बागेतीलच असूनही संबंधित नागरिकाला त्याची अडचण होत आहे.
शहरात राहून पर्यावरणापासून दूर जात असल्याचेच हे चित्र आहे. एकीकडे प्रसिद्ध वास्तूशिल्पकार लाॅरी बेकर सांगतात की, इमारतीची उंची झाडांमध्ये दिसणार नाही, एवढीच हवी आणि घराभोवती झाडं हवीत. त्याने पर्यावरणपूरक जीवनशैली जगता येते. असे असताना दुसरीकडे सिमेंटच्या जंगलात मात्र काही लोकांना झाडं नको आहेत. खरं तर या झाडांचा ऑक्सिजन घेऊनच सर्वजण जिवंत आहेत. जर ऑक्सिजन नसेल तर आज किती तरी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे झाड न तोडता, तसेच ठेवून फक्त त्या नागरिकाने खिडकीत येणाऱ्या फांद्या तोडाव्यात असा सल्ला पर्यावरणप्रेमी कुटुंबाने दिला आहे. पण, ते गृहस्थ ऐकायलाच तयार नाहीत. आमच्या खिडकीतील फांदी आम्ही तोडणार नाही, असा हेका त्यांनी ठेवला आहे. त्या नागरिकाला झाडच तोडायचे आहे की, काय अशी शंका यावरून येत असल्याचे बोलले जात आहे.
पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या पर्यावरणप्रेमी कुटुबांतील एका सदस्याने त्यांच्या सोसायटी गार्डनमध्ये कुंडीत झाडं लावली होती. पण कुंडीत डास होतात म्हणून त्या कुंड्या देखील काढायला लावल्या आहेत. त्यामुळे झाडंच नको अशीच इच्छा संबंधित तक्रारदार नागरिकाची झालेली आहे, अशीच शंक उपस्थित होत आहे.
---------
हा करा उपाय
झाडावर जर उंदीर, घुस जात असतील तर एक उपाय देखील आहे. वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांनी त्यांच्या शेतात यावर एक उपाय केलेला आहे. त्यांनी
झाडाच्या मधोमध एक मेटलची शिट लपेटून ठेवली आहे. त्या शिटवरून उंदीर, घुस झाडावर चढता येत नाही. हा पर्याय सर्वच ठिकाणी उपयोगी ठरणारा आहे, ज्यांना या उंदीर, घुशीचा त्रास होत असेल, त्यांनी अशा प्रकारे उपाय करावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
---------