लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोसायटीत शिरलेल्या भटक्या कुत्र्यांना हाकलल्याने वाद होऊन त्यात तरुणाने एकाच्या अंगावर आपला पाळीव कुत्रा सोडला. त्यात कुत्रा चावल्याने हडपसर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तपन संजय मेहता (वय २७, रा. बिनावत टाऊनशिप, ससाणेनगर, काळेपडळ रोड, हडपसर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. संजय रमण मेहता व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
याप्रकरणी सुनील महादेव नाईक (वय ५३, रा. बिनावत टाऊनशिप, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे दोन्ही बिनावत टाऊनशिपमध्ये राहतात. १५ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाईक हे सोसायटीमध्ये येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना बाहेर हाकलत होते. त्याचा संजय मेहता यांना राग आला. त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करून आपला मुलगा तपन याला बाहेरुन मुले आणण्यास सांगून बेकायदेशीर जमाव जमवला. दोघांनी मिळून नाईक व त्यांच्या पत्नीस दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांच्याकडील पाळीव कुत्रा चावण्यासाठी नाईक यांच्या अंगावर सोडला. पाळीव कुत्रा चावल्याने नाईक हे जखमी झाले. उपचार घेतल्यानंतर नाईक यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.