पुणे : महापालिकेच्या वतीने पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत शहराच्या विविध विभागांत गाळे बांधण्यात आले आहेत. परंतु गेल्या आठ वर्षांपासून हे गाळे वापराविना पडून आहेत. पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या पथदर्शी प्रकल्पाचा भाग असलेला औंध-बाणेर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. फुटपाथवर भाजीविक्रेते, फेरीवाल्यांच्या गाड्या उभ्या असल्याने नागरिकांना चालणेदेखील कठीण होते. या अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले की महापालिकेचे अधिकारी उलट नगरसेवकांनाच सुनावतात. लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात, असा आरोप अर्चना मुसळे, प्रकाश ढोरे, विजय शेवळे आदी सदस्यांनी केला आहे. भाजप सदस्यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँगे्रसचे बाबूराव चांदेरे यांनी आक्षेप घेतला. कारवाई करायची असेल तर सरसकट सर्व अतिक्रमणांवर करावी, यामध्ये दुजाभाव करू नये, अशी मागणी देखील चांदेरे यांनी केली. या संदर्भात प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले की, शहरात महापालिकेकडून शहर फेरीवाला धोरण २००९ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत परवाने देण्यात आले आहे. परवानाधारक त्या जागेवर नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेतून चार ठिकाणी पुनर्वसनासाठी गाळे उभारलेले असून अद्याप त्या ठिकाणी कोणतेही पुनर्वसन झालेले नाही. कारवाईचे योग्य प्रकारे नियोजन करण्याचे आश्वासन देऊन याबाबतची माहिती मागवू. (प्रतिनिधी)
पथारी व्यावसायिकांसाठीचे गाळे पडून
By admin | Published: April 24, 2017 5:06 AM