माध्यमिक शाळेतील कारकून ते कार्यालयीन अधीक्षक असा प्रवास करणारे नाशिक जिल्ह्यातील अर्जुन पवार यांच्या ''अर्जुनायन'' या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी अर्जुन पवार बोलत होते. या वेळी प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अर्जुन पवार यांचे पुत्र व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, तसेच सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते. अर्जुन पवार यांनी नुकतीच वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली असून, त्यांचा जीवनप्रवास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, अर्जुन पवार यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामान्य घरातून येत आपल्या जिद्द व चिकाटीने त्यांनी त्यांचे असामान्यपण सिद्ध केले आहे.
डॉ. उमराणी म्हणाले की, ''अर्जुनायन'' मधील भाषा अत्यंत साधी व मनाला भावणारी आहे. अर्जुन पवार यांच्या लिखाणातून कुटुंबविषयी ओढ, तळमळ दिसून येते.
डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, दादांच्या या लेखनाने आम्ही आमच्या मुळापर्यंत जात आमचा कौटुंबिक संघर्ष समजू शकलो.
------