पुणे : भारतीय सैन्यदले ही भारताची आदर्श संस्था आहे. भारतीय सैन्यदलाकडे असंख्य आव्हाने पेलण्याची ताकद असून सैन्य हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे असे मत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी मंगळवारी व्यक्त केले. पंडित दिनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतंसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा पंडित दिनदयाळ जीवनगौरव पुरस्कार पित्रे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सैन्य दलातील अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या पित्रे यांना अकरा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सनामानित करण्यात आले. संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंत भसाळकर, सुभाष चुत्तर व संस्थेचे मिलिंद एकबोटे, सुहास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा.माधुरी जोशी, बापू भेगडे, डॉ.अभय किणीकर, सदानंद सरदेशमुख, अतुल बहिरट, सुभाष इनामदार व पत्रकार मोरेश्वर जोशी यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.पित्रे म्हणाले, ज्यांच्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, अंत:प्रेरणा आहे त्यांना करीयरसाठी भारतीय सैन्यासारखा दुसरा पर्याय नाही. मात्र विविध कारणांनी सैन्य दलाचे चुकीचे चित्र आपल्यासमोर येऊन त्याच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन होऊ लागले असल्याची खंतही पित्रे यांनी व्यक्त केली.पुरंदरे म्हणाले, गरज आहे त्या ठिकाणी धावून जाणे गरजेचे आहे. सध्या असणारी अनेक दु:ख आपण ओढवून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मन सैनिकांना दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या सैनिकांना केवळ प्रशिक्षण दिले जात नाही, तर अंत:करण दिले जाते.’’
असंख्य आव्हाने पेलण्याची ताकत सैन्यदलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2016 12:24 AM