पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १८ वर्षे वयापुढील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. मात्र, आरोग्य विभागाकडे असणारे मनुष्यबळ राज्यातील सर्व जनतेला लस देण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यापीठातून हजारो विद्यार्थी पुढे येत आहेत. परिणामी लसीकरणाच्या मोहिमेत एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे बळ कामी येणार आहे.
उच्चशिक्षण विभाग व आरोग्य विभाग संयुक्तिकपणे लसीकरण मोहिमेत काम करणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकांशी संवाद साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिमेमध्ये समाविष्ट करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची सहमती घेतली जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक दिवसाचे प्रशिक्षण देणार आहे. हे विद्यार्थी प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेत विविध पातळ्यांवर मदत करू शकतात. आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या सूचनेनुसार लसीकरण संदर्भातील नोंदी ठेवणे किंवा इतर कामे त्यांच्यावर सोपविली जाणार आहेत. दोन दिवसांत जळगाव विद्यापीठातील सुमारे ९०० विद्यार्थी तयार झाले आहेत. इतरही विद्यापीठांमधील हजारो विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होण्यास तयार आहेत, असेही एनएसएस राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले.
चौकट
एका विद्यार्थ्याने घेतले सुमारे दहा कुटुंब दत्तक
केंद्र शासनाने १८ वर्ष पुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एनसीसीचे स्वयंसेवक प्रत्येक गावात व आपल्या परिसरातील नागरिकांचे लसीकरणाबाबत प्रबोधन करणार आहेत. मागील वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिर व गरजूंना आवश्यक मदत करण्याचे काम केले होते. त्यासाठी एका विद्यार्थ्याने सुमारे दहा कुटुंब दत्तक घेतले होते. हेच काम आता मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. पुणे विद्यापीठाचे सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढे येतील, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना विरुद्धच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेत राज्यातील सर्व विद्यापीठांमधील एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने मदतीसाठी सहभागी होणार आहेत. १८ वर्षापुढील एकही व्यक्ती लस घेण्यापासून सुटू नये, यासाठी एनएसएस स्वयंसेवक जनजागृती करणार आहेत.
- डॉ. प्रभाकर देसाई, एनएसएस राज्य जनसंपर्क अधिकारी