पुणे : बंडानंतर शांत असलेल्या जिल्हा शिवसेनेत बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर वादळ फिरू लागले आहे. विद्यमान खासदार व माजी खासदारांसह माजी मंत्री, माजी नगरसेवक यांचे पाठबळ शिवसेनेला मिळू लागले आहे. शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाचे साह्य गृहीत धरले असून, त्या जोरावर राजकीय बाजी मारण्याचा विचार सुरू असल्याचे दिसते आहे.
मावळ व शिरूर अशा दोन लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेने चांगले पाय रोवले होते. त्यानंतर खेड-राजगुरूनगर, पुरंदर अशा विधानसभा मतदारसंघांतही शिवसेनेचा झेंडा लागला होता. मात्र आता बदलत्या स्थितीत नेमक्या याच मतदारसंघांनी मुख्यमंत्री शिंदे गटाची कास धरली आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यात शिवसेनेला तग धरून राहावे लागले असे दिसते आहे. तिथे आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अनेक वर्षे बस्तान बांधले आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या १२ खासदारांमध्ये बारणे यांचा समावेश आहे. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही मौन सोडत शिंदे गटाशी जवळीक केली. पुरंदर विधानसभेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी तर सुरुवातीपासूनच शिंदे यांच्याबरोबर संधान बांधले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये शिवसेना राहिली तरी ती शिंदे गटाची असेल अशी चिन्हे आहेत.
पुणे शहरात बंडाच्या सुरुवातीला शांतताच होती. त्यामुळे इथे काही होणार नाही अशी मुंबईकर शिवसेना नेत्यांची अपेक्षा होती. मात्र हडपसरमधील माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी अचानक शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्याबरोबर लगेचच माजी शहरप्रमुख अजय भोसले हेही आले. त्यानंतर माजी मंत्री उदय सामंत यांचे समर्थक असलेले युवासेेनेचे प्रदेश सचिव यांनी सामंत यांच्यापाठोपाठ लगेचच शिंदे गट जवळ केला. आता तर जिल्हाप्रमुख असलेले रमेश कोंडेच त्यांना येऊन मिळाले आहेत.
पुणे महापालिकेत गट आक्रमक होणार ?
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत हा गट आक्रमक होणार असल्याची चिन्हे आहेत. नाना भानगिरे यांनी शिवसेनेचे आणखी काही नगरसेवक संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. महापालिका निवडणूक लढवायचीच या विचाराने झपाटलेले काही इच्छुकही शिंदे गटाचा गंडा बांधून घेण्यास तयार झाल्याची चर्चा आहे. भाजपचे राजकीय साह्य मिळणार असल्याने हा गट फक्त मुळ शिवसेनेसमोरच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्थापितांसमोरही राजकीय आव्हान निर्माण करू शकतो.