लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वातंत्र्यलढ्यात राजकीय विचारांबरोबर असलेली राष्ट्र सेवा दल संघटना स्वातंत्र्यानंतर राजकारणापासून बाजूला गेली व त्यामुळे क्षीण झाली. समविचारी राजकीय विचारांना मदत करण्यासाठी सेवा दलाला पुन्हा तयार करावे लागेल, असा मानस राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला.
ते पुण्यात बोलत होते. देशात सुरू असलेल्या अतिरेकी राष्ट्रवादाला उत्तर देण्यासाठी हे आवश्यक आहे. सेवा दलाचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान सर्वपरिचित आहे. समविचारी राजकीय पक्षांना मदत करण्यात सेवा दल सक्रिय होता. यापुढे सेवा दलाचे कार्यकर्ते समविचारी पक्षांना मदत करतील, त्यात सक्रिय राहतील असे डॉ. देवी म्हणाले.
स्वातंत्र्यलढ्यात सन १९४२ चे महत्त्व फार मोठे आहे. देशभरच्या ‘छोडो भारत’ चळवळीत अनेक जण हुतात्मा झाले. त्या सर्वांचे एकत्रित स्मारक सेवा दलाच्या वतीने बांधण्यात येणार आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व एकत्रित असे पुण्यात या दोन स्तरावर हे स्मारक असेल. १५ ऑगस्ट २०२१ मध्ये हे स्मारक खुले करण्यात येईल. नव्या पिढीला स्वातंत्र्य व त्या स्वातंत्र्याने दिलेल्या समता, बंधुतेची प्रेरणा मिळावी, असा उद्देश यामागे आहे, असे डॉ. देवी म्हणाले.
डॉ. देवी यांनी सांगितले की, देशाच्या १२ हजार वर्षांच्या इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी केंद्राने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीचे सर्व सदस्य उत्तर भारतातील आहेत. त्यात एकही स्त्री अभ्यासक नाही. सरकारला काय हवे आहे ते त्यांच्या सर्व धोरणांमधून स्पष्ट दिसते. त्यांना हवा आहे तसाच इतिहास लिहिला जाईल हे उघड आहे. त्यामुळेच त्याला उत्तर म्हणून स्वतंत्रपणे याच १२ हजार वर्षांच्या इतिहासाचे लेखन करणार आहे.” चुकीचे व काहीही अयोग्य प्रस्थापित होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे. सुरुवातीचा मानव, त्यानंतर भाषा, त्याची अवजारे, शेती, त्याचा विकास अशा अनुषंगाने सुमारे अडीच हजार पृष्ठांचा ग्रंथ तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
महिलांचा असाही सन्मान
देशात सरकारी स्तरावर वापरण्यात येणारे खादीचे राष्ट्रध्वज तयार करण्याचे केंद्र हुबळीला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी फक्त महिलाच काम करतात. या महिलांचा सन्मान म्हणून राष्ट्र सेवा दल, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, छात्रभारती व अन्य काही संघटना या ध्वजांचे वितरण पुण्यात करणार असल्याचे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.