पुणे : कोरोनाच्या कठीण काळात पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी- चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरलेल्या जम्बो रुग्णालयाचा सांगाडा मजबूत आणि सुस्थितीत असल्याचा अहवाल दिल्ली आयआयटीने पुणे महापालिकेला दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णासंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जम्बो सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ९०४ बाधित रुग्ण नोंदविले गेले. वाढत असलेल्या रुग्णापैकी ७० टक्के रुग्ण गृहविलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. परंतु, त्याचसोबत ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. आजमितीस पुण्यात ६६४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर, ३०० रुग्ण अत्यवस्थ आहेत. त्यामुळे आता पुन्हा जम्बो कोविड सेंटरची गरज भासू शकते. त्यासाठी प्रशासन हे सेंटर सुरू करण्याच्या हालचाली करत आहे.
शहरातील रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते. रुग्णांना उपचारांसाठी खाटा कमी पडू नयेत, तसेच चांगले उपचार मिळावेत याकरिता पालकमंत्री अजित पवार यांनी जम्बो रुग्णालय सुरु करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानंतर महापालिका, पीएआरडीए आणि जिल्हा प्रशासनाच्या सहभागातून उभारण्यात आलेल्या जम्बोचे टाळे पुन्हा उघडण्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेने दिल्ली आयआयटीमार्फत सुस्थितीविषयक ऑडिट करून तसे प्रमाणपत्र घेतले आहे. या प्रमाणपत्राची मुदत तीन महिन्यांसाठी आहे.
--------
दरमहा पाच नव्हे दोनच कोटी देणार
जम्बो सेंटरसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराला दरमहा पाच कोटी रुपये द्यावे लागत होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारासोबत दर कमी करण्याबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून यापुढे दरमहा दोन कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
---------------