पुणे : संपूर्ण पुणे विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण वाढला आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पदे भरली गेली नाहीत. एकूण २९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०६ पदे कार्यरत असून ९१ पदे रिक्त आहेत. राज्य उत्पादनच्या पुणे विभागाकडे अधीक्षकांसह उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, सहायक दुय्यम निरीक्षक, वाहनचालक, जवान अशी एकूण २९७ पदे मंजूर आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षामध्ये पुणे विभागाच्या महसूलामध्ये ८ टक्के वाढ झाली आहे. राज्यातील अन्य विभागांपेक्षा चांगली वाढ पुणे विभागात झालेली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील ५०० मीटरच्या आतील मद्यबंदीच्या निर्णयानंतरही वाढ झालेली आहे. या विभागाकडून मद्यावरील महसूल गोळा करण्यासोबतच परवाने देण्याचे काम केले जाते. मद्यसाठा, परवाने आणि महसूल याची तपासणी करणे ही मुख्य जबाबदारीही या विभागाकडे आहे. मंजूर मनुष्यबळामध्ये प्रत्यक्ष कारवाईचा अधिकार असलेले अवघी ७४ पदे आहेत. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय परवाने देण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. चालू वर्षामध्ये २ हजार १६० कारवाया करण्यात आल्या असून ५ कोटी ५२ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१६ मध्ये २ हजार २५० कारवाया करण्यात आल्या होत्या. तर, ५ कोटी २८ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. गेल्या वर्षीपेक्षा २३ लाख ५१ हजारांचा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपअधीक्षक | ०२ |
निरीक्षक | ०८ |
दुय्यम निरीक्षक | ५२ |
वरिष्ठ लिपिक | ०१ |
लिपिक-टंकलेखक | ०२ |
स़ दुय्यम निरीक्षक | १२ |
वाहनचालक | ०२ |
जवान | १२ |
एकूण | ९१ |