Ajit Pawar: कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:16 PM2021-12-10T13:16:00+5:302021-12-10T13:18:41+5:30
नागरिकांनी सहकार्य केले नाही तर प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना दिला...
पुणे:पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र दुसरा डोस घेण्यास काहीजण टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः बारामती, इंदापूर तालुक्यात अनेक जण दुसरा डोस घेण्यास उत्सुक असलेले दिसत नाहीत. त्या भागात दुसरा डोस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे देखील प्रयत्न सुरू आहेत. यावर देखील नागरिकांनी सहकार्य केले नाही तर प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना दिला.
पुणे जिल्ह्यात शासनाकडून मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून दिले जात असताना ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग कमी असल्याने जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नोव्हेंबर अखेरपर्यंत शंभर टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यासाठी हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यामुळेच बुधवार (दि.8) रोजी दुपारी जिल्ह्यातील शंभर टक्के 83 लाख 44 हजार 544 लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला. तर 54 लाख 82 हजार (65.7%) लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्यासह जिल्ह्यात जानेवारी 2021 महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पण सुरूवातीचे सहा महिने लसीकरणाचा वेग खूपच कमी होता. परंतु जुलै- ऑगस्ट पासून केंद्र शासनाने पुरेशा प्रमाणात लसीचे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळेच जिल्ह्यात ख-या अर्थाने ऑगस्ट नंतरच लसीकरण मोहिमेला वेग आला. शासनासोबतच खाजगी रुग्णालये आणि अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन लसीकरणासाठी पुढाकार घेतला. तर जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी करून दिवसाला तब्बल एक-दीड लाख लोकांचे लसीकरण पूर्ण होईल असे नियोजन केले. "मिशन कवच कुंडल " अभियानांतर्गत तर दिवस रात्र व सुट्टीच्या दिवशी स्वतंत्र विकेंड लसीकरण मोहिम राबविण्यात आली.