पुणे : रेल्वेतून प्रवास करताना एखाद्यावेळी अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत साखळी ओढून (अलार्म चेन) रेल्वे थांबविण्यासाठी डब्यात अलार्म चेन असते. रेल्वेने ही चेन फक्त आपत्कालीन काळात वापरण्यासाठीच बंधनकारक केली आहे; परंतु काही प्रवासी किरकोळ कारणासाठी अनाआवश्यक या चेनचा दुरुपयोग करतात. अशा प्रवाशांवर एप्रिल २०२३ ते २८ जून २०२४ या कालावधीत पुणे रेल्वे विभागात १९९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १४४० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ७३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वेतून प्रवास करताना कधी जीवघेणा प्रसंग उद्भवला किंवा अपघात झाला, कुठे आग लागली, अशावेळी प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी साखळी ओढण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी याचा वापर करताना दिसून आले. त्यामुळे इतर प्रवाशांना याचा त्रास होतो. परिणामी गाडी थांबविल्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे पुढील सर्व गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. काहीवेळा तर प्रवाशांना स्टेशनवर पोहचायला उशीर झाल्यामुळे गाडी थांबविण्यासाठी पुलिंग चेन ओढताना आढळून आले आहे. अशा प्रवाशांना रेल्वेच्या कायद्यानुसार कलम १४१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
गैरवापर करू नये यासाठी जनजागृती...
एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेनचा गैरवापर झाल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. अशा अनुचित घटना होऊ नयेत, यासाठी रेल्वे विभागाकडून सतत जनजागृती केली जाते. स्टेशनवर अलाऊन्स करून सूचना देण्यात येते. रेल्वेच्या डब्यातदेखील या संबंधित माहिती लिहिलेली असते. तरीही काही प्रवासी याचा गैरवापर करताना आढळून येतात.
मध्य रेल्वे विभागात ६३ लाख दंड वसूल...
एप्रिल २०२३ ते २८ जून २०२४ या काळात अलार्म चेन ओढण्याच्या मध्य रेल्वेने ११ हजार ४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१ नुसार ९ हजार ६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६३ लाख २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.यामध्ये पुणे रेल्वे विभागात १९९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १४४० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ७३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तेव्हा अलार्म चेन ओढण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.