तालुक्यातील सध्या रोज अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत देत, सुरुवात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांपासून केली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक या कोरोनाबाबत गांभीर्य घेत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. असे असूनही अनेक जण मास्क न लावता बिनधास्त बाजारात फिरत आहेत. मास्क न लावणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर आता कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. यासाठी गावातील एसटी स्टँड परिसरात, महसूल आणि पोलीस प्रशासनाने मास्क न लावलेल्या नागरिकाकडून ५०० रुपये दंड आकारणी केली जात आहे.
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी तालुक्याच्या पूर्व भागातील बाजारपेठा, बस स्थानक, भाजी मार्केटमध्ये फिरून मास्क न वापरणाऱ्या दुकानदार, तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे, तसेच नागरिकांनी बाहेर पडताना मास्क वापरावे, असे आवाहनही केले आहे. त्याचप्रमाणे, राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही, लग्न समारंभ, आठवडे बाजार आणि सार्वजनिक कार्यक्रमात आता तरी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
- निरगुडसर- येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मंचर पोलिसांकडून करण्यात आली.