रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. दरम्यान, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे ही बाब गंभीर असून,नागरिकांनी याबाबत सतर्क राहावे असेही ते म्हणाले.
पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे शिरुर तालुक्यातील आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या ३९ गावांच्या आयोजित कोरोना आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी आंबेगाव - शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ,प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख,तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दामोदर मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पाटील आदी उपस्थित होते.
शिरुर तालुक्यातील ३९ गावांमध्ये रुग्णसंख्या वाढल्यास तत्काळ पाबळ येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचना मंत्री वळसे पाटील यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. रांजणगाव एमआयडीसी व मलठण येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून,येथे रुग्णांना तत्परतेने उपचार उपलब्ध करुन द्यावेत.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३९ गावांतील रुग्णांसाठी वाढीव लस उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना दूरध्वनीद्वारे केल्या.नागरिकांनी लग्नसोहळा,धार्मिक कार्यक्रम,विविध सण,उत्सवातील गर्दी टाळावी असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.
यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील कोरोनास्थितीचा व कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेऊन आगामी काळात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला मार्गदर्शक सूचना केल्या. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे तालुक्यात पूर्वीसारखेच कोव्हीड सेंटर सुरू राहणार आहेत.यावेळी प्रांताधिकारी देशमुख,तहसीलदार लैला शेख यांनी यांनी तालुक्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली.
२२ रांजणगाव
पुणे येथे शिरुर तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाचा दिलीप वळसे पाटील यांनी आढावा घेतला.