पुणे : वन्यप्राण्यांची अवैध शिकारीवर आळा घालणे, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्यासाठी पोलीस विभाग, वन विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांची पुणे जिल्हा व्याघ्र कक्ष समिती तयार केली आहे. त्याअंतर्गत मानव-वन्यप्राणी संघर्षावरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
या वेळी बैठकीत पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, वन विभागाचे एस. पी. कडू, डी. वाय भुर्के, ए. एल. भिसे, पुष्कर चौबळ आदी उपस्थित होते.
जनतेमध्ये वाघ, बिबटे व इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपलब्ध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. वन गुन्ह्यातील आरोपींना पोलीस कोठडीत ठेवणे, अतिक्रमण निष्कासित करतेवेळी पोलीस बंदोबस्तासाठी सहकार्य घेणे, गौनखनिज वाळूतस्करीसाठी अटकाव करणे, रक्तचंदन तस्करी, शेजारच्या राज्यांचे वन्यप्राण्यांचा अवैध व्यापार आदींवर कडक लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा मिळून काम करणार असल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली.
अभिनव देशमुख यांनी वन विभागाला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.