बारामती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभागात आठ ठिकाणी नाकेबंदी सुरू आहे. नाकेबंदी पथकात एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नाकाबंदीसाठी ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सांगवी पूल (बारामती तालुका पोलीस ठाणे), गुंजखेडा (वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे), भवानीनगर (कारखान्यासमोर), कळंब (इंदापूर), सरडेवाडी टोलनाका (इंदापूर), सराटी (इंदापूर), कर्जत-जामखेड रोड (भिगवण), पुणे-सोलापूर महामार्ग (इंदापूर) या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.बारामती, इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील १८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून निवडणूककाळात कोणताही गैरप्रकार होणार नाही, वर्तणुकीबाबत यासंदभार्तील लेखी हमीपत्रही घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कलम १०७, १०९, ११०, १४९ अन्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभागातील पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक, तडीपारी, मोक्का अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.............कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करणाºया २१३ जणांवर बारामती उपविभागातील हद्दीतील पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. हाणामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न, खून यांसारख्याशरीरविषयक गुन्ह्यांसह मालमत्तेसंबंधीच्या गुन्ह्यांमध्येही सक्रिय असणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र,संबंधितांचा मतदानाच्या दिवशी मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कलम ५५, ५६, ५७ नुसार २२ जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.मतदान दिवशी नागरिकांना त्याचा मतदानाचा हक्क बजावताना कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी ३६ पथके तयार केली आहे. त्यामध्ये १६ बारामती विधानसभा मतदारसंघात, तर २० इंदापूर मतदारसंघात पथके काम करणार आहे. त्यासाठी ३६ पोलीस अधिकारी, १४४ कर्मचारी, ७२ होमगार्डची नेमणुका केल्याची माहिती प्रशासनाने दिली. ......बारामती उपविभागात बारामती, इंदापूर या दोन विधानसभांचा समावेश आहे. दोन्ही विधानसभांमध्ये ६९६ बूथ आहेत. यामध्ये ९५ बारामती शहर, १२२ बारामती तालुका, १५० वडगाव निंबाळकर, १६३ इंदापूर, ३५ भिगवण, १३१ वालचंदनगरचा समावेश आहे. तर दोन्ही विधानसभा मतदारसंघात २० बारामती, १५ इंदापूर संवेदनशील मतदार बूथचा समावेश आहे.