लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या ही अद्यापही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढत आहे. त्यात आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेने स्वयंसेवी संस्थांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात १०७ गावांत कोरोना वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. या गावांत येत्या १५ दिवसांत कोरोना नियंत्रणात आणण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून अहवाल येईपर्यंत घरातच विलीगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सोबतच नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत.
ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. अनेक गावे ही कोरोनामुक्त झाली होती, तर काहींनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. मात्र, ही परिस्थिती बदलत असून पुन्हा कोरोना नव्या गावात आपले पाय पसरू लागला आहे. जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गावांत कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले असून शुक्रवारी या गावांच्या सरपंचांशी त्यांनी संवाद साधला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात ती आटोक्यात येत नसल्याने ही बाब चिंताजनक आहे. त्यात १०७ गावांमधून कोरोना अद्यापही हद्दपार झाला नाही. या गावातून कोरोना प्रसाराचा धोका असल्याने या गावांना कोरोनामुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन, जिल्हापरिषद प्रशासन आणि पोलिसांतर्फे या गावात उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. तशा सूचना प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामसेवकांना दिल्या आहेत.
१०७ गावांतून कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जोपर्यंत चाचणी अहवाल येत नाही तोपर्यंत घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. लक्षणे असो वा नसो पुढील १५ दिवस कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने घरातही मास्क घालने बंधनकारक राहणार आहे. या सोबतच घरात वावरताना शारीरिक अंतराचे पालन होईल या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: झोपताना काळजी नागरिकांनी घ्यावी. या सोबतच बाथरूम आणि शौचालयाचा वापर झाल्यावर त्याचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना सर्व सरपंचांना करण्यात आल्या आहेत.
चौकट
१०७ गावांत नेमण्यात येणार स्वयंसेवक
शांतिलाल मुथा फाउंडेशन आणि भारतीय जनसंघातर्फे १०७ गावात कोरोना नियंत्रणासाठी स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. हे स्वयंसेवक गावात मार्गदर्शन करणार आहेत. या स्वयंसेवकाचे मोबाईल क्रमांक पोलीस यंत्रणा, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना देण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत या गावात विशेष मोहिमा राबविल्या जाणार आहेत.
चौकट
प्रशासनाला गावात तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस यंत्रणेमार्फत या गावात विशेष मोहिमा राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत. गावाला प्रत्यक्ष भेटी द्याव्या. त्या ठिकाणच्या नागरिकांच्या तपासण्यांचे नियोजन करणे बंधनकारक राहणार आहे. सध्या तपासण्यांसाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र, यासाठी मेलेरिया तपासणी करणाऱ्या यंत्रणेचे सहकार्य घेतले जाणार आहे.
कोट
१५ दिवसांत रुग्णांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट
१०७ गावांत येत्या १५ दिवसांत रुग्णांची संख्या कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाला सूचना करण्यात आल्या असून याचे चांगले परिणाम काही दिवसांतच दिसतील, असा विश्वास आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी