पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान व्हावे, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चारही मतदारसंघांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर आठ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज आहे. चारही मतदारसंघांत ७३ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार) मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी आणि आदल्या रात्री अनेक गैरप्रकार घडतात. ते टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. शहरात आज चार ते पाच पथकांमार्फत गस्त घातली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गस्त घालणार आहेत. या पथकात ‘स्ट्रायकिंग फोर्स’ देण्यात आला आहे. दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ६५ फौजदार, तसेच पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात असतील. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची १ तुकडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाची १ तुकडी आणि गुजरात, झारखंड, गोवा राज्याच्या राखीव पोलीस दलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात राहणार आहे. शीघ्र कृती दल, दंगा काबूपथकही असेल. मतदानाचे साहित्य वाटप करताना आणि परत स्वीकारण्याच्या वेळी योग्य बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. बोगस मतदान होण्याची शक्यता असलेल्या आणि संवेदनशील मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्र असलेल्या इमारतीच्या ठिकाणी किमान एक पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार यांनी दिली. (प्रतिनिधी)
शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
By admin | Published: October 15, 2014 5:34 AM