लोणावळा : मागील शनिवार व रविवारी लोणावळ्यात प्रचंड गर्दी झाल्यानंतर ह्या शनिवारी व रविवारी सकाळपासूनच लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांनी पर्यटनस्थळ बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली आहे. शनिवारी भुशी धरण, टायगर व लायन्स पाॅईट, गिधाड तलाव, सहारा पुल धबधबा, कार्ला लेणी, भाजे लेणी हा सर्व परिसर निर्मनुष्य पहायला मिळाला. आजही सकाळपासून बंदोबस्त लावण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी नौसेना बाग याठिकाणी नाकाबंदी लावली आहे.
पावसाळी पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात दरवर्षी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. मात्र मागील दिड वर्षापासून कोरोना महामारीमुळे पर्यटनस्थळे बंद आहेत. पंधरा दिवसापूर्वी जिल्हाबंदीचे आदेश रद्द केल्याने मागील शनिवार व रविवारी लोणावळ्यात काही हजार पर्यटक दाखल झाल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. समाज माध्यमातून गर्दी हे फोटो व व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आजच्या शनिवारी पोलीस प्रशासनाकडून पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे कडक नियोजन करण्यात आले होते. मुख्यालयातून देखील मोठा बंदोबस्त आला होता. सर्व पर्यटनस्थळांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नजर चुकवून पर्यटनस्थळांपर्यत येणार्यांना लागलीच माघारी पाठविण्यात येत होते.
लोणावळा शहरात पर्यटनस्थळ बंदी असली तरी पर्यटकांना येण्यास बंदी नसल्याने पर्यटक शहरात येत होते. यामुळे हाॅटेल व बंगले फुल्ल झाले आहेत. भुशी धरण परिसरात व्यावसाय करणारे व्यावसायिक मात्र पर्यटक येत नसल्याने हतबल झाले होते. मागील दिड वर्षापासून हीच परिस्थिती असल्याने आमची आर्थिक स्थिती खालावली असल्याचे या भागातील व्यावसायकांनी सांगितले. मात्र कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्वजण शासन आदेशाचे पालन करत असल्याचे दिसून आले.