नारायणगाव : शासनाने जाहीर केलेला दोन दिवसांच्या लॉकडाऊनला नारायणगाव आणि वारूळवाडी शहरात १०० टक्के प्रतिसाद देत नागरिकांसह व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखळी तोडण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार व जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शनिवार आणि रविवार पूर्णतः लॉकडाऊन पाळण्यात आला .
नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे व वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी परिसरातील छोटे - मोठे व्यावसायिक, दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेते, गाळेधारक यांना कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी केलेल्या बंदच्या आवाहनाला सर्वांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला .
विनाकारण फिरणाऱ्या लोकांना प्रतिबंध व्हावा म्हणून नारायणगाव पोलिसांनी ठिकठिकाणी चेकनाके उभारून वाहनचालकांची उलट तपासणी केल्याने बाहेर फिरणाऱ्या लोकांवर चांगलाच जरब बसला होता . विनाकारण फिरणाऱ्यांना लोकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होत असल्याची माहिती परिसरात समजल्याने अनेकांनी बाहेर न पडता घरीच थांबणे पसंत केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड अपुरे पडत आहे. रेमडेसिविरसारखे इंजेक्शन मुबलक प्रमाणात नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, शासनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, नारायणगाव पोलीस विभाग व नारायणगाव आणि वारूळवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
११ नारायणगाव
कायम वाहतूककोंडी असणाऱ्या पुणे – नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे लॉकडाऊनमुळे असलेला शुकशुकाट.