वारजे : शिवणेत भर पावसात मुठा नदी पात्रातून पळून जाणाऱ्या वाळू माफियांच्या ट्रॅक्टर व जेसीबी वाहनांना स्वतःची मोटार आडवी घालून रोखण्याची सिनेस्टाईल कामगिरी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केली आहे. यातील आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असले तरी त्यांचे ट्रॅक्टर व जेसीबी मशीन जप्त करण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे.
शहरी भागात चालू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पावले उचलली जात असली तरी आरोपींना पकडण्यात यश काही येत नव्हते. शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी यांना शिवण्यात वाळू उपसा करण्यासाठी वाहने व यंत्रे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तहसीलदार यांना पुढील कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तहसीलदार कोलते यांनी यांनी आधी पोलिसांना कळवून शिवण्याकडे प्रयाण केले. नदीपात्रातून बाहेर येण्यासाठी शिवणे नांदेड पुलाजवळ जी अरुंद जागा आहे तेथेच आपले मोटर आणून तहसीलदार यांनी समोरून येणाऱ्या गाड्यांना रोखले. गाड्या निघायला जागाच शिल्लक नसल्याने या गाड्या तेथेच थबकून राहिल्या व त्यातील ड्रायव्हर व इतर कामगारांनी पोलीस येण्यापूर्वीच अंधारात नदीपात्रात धूम ठोकली.
पोलीस १० मिनिटे उशिरा पोहोचल्याने तस्करांना रंगेहाथ पकडणे शक्य झाले नसले तर जेसीबी मशीन ट्रॅक्टर व चाळणी जप्त केल्याने त्याच्या नंबर वरून तपास केल्यास ही वाहन मालक व तस्करांचा शोध घेणे शक्य असल्याचे मत तृप्ती कोलते पाटील यांनी व्यक्त केले. या प्रकरणी मंडल अधिकारी प्रमोद भांड यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जवळगी करीत आहेत.