दौंड : तालुक्यातील दिव्यांगांना मतदानाच्या वेळी शासनाने योग्य त्या सुविधा दिल्या नाहीत तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर दिव्यांग बांधव बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री यांनी दिला.दौंड नगर परिषदेच्या परिसरात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी मंत्री बोलत होते.
निवडणूक आयोगाने दिव्यांगांना मतदान करण्यासाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अपंगांना मतदान बूथजवळ रॅम्पची व्यवस्था, मतदान बूथपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था ही कामे शासनाची आहेत.मात्र शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. याचा उपद्रव व्यापारी आणि नागरिकांना होत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरातील रस्त्यांची कामे सुरु आहेत. बाजारपेठेतील मुख्य रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. अर्धा किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी चार महिने जात आहेत. ही गंभीर बाब आहे. मात्र रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आंदोलनस्थळी मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी भेट देऊन अपंगांच्या सोयी-सुविधांसाठी योग्य ते प्रयत्न केले जातील, असे सांगितल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करा...४दौंड शहरात सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहेत. यासाठी रस्ता विस्तारीकरण शासनाच्या नियमात आहे. रस्ता विस्तारीकरणासाठी रस्त्यालगतची प्रार्थनास्थळे पाडून रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळाचे नागरिक पुढे आले आहेत. मात्र व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, नियमबाह्य इमारती, दुकाने अडथळा ठरत आहेत. मात्र रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यासाठी उदासीनता दाखवली जात आहे, असे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.